आमदार जीत आरोलकर : कलम ३९(अ) ला तीव्र विरोध

पेडणे : पेडणे तालुक्यातील पर्यायाने मांद्रे मतदारसंघातील डोंगर माळराने, जमिनी, शेत जमिनी, खाजन जमिनी, भरड शेती या सर्व जमिनी सुरक्षित रहाव्यात यासाठी नगर नियोजन कायद्यातील कलम ३९ (अ) अंतर्गत झोन बदल आणि भू रूपांतराला तीव्र हरकत आहे. त्यासाठी आपण आगामी विधानसभा अधिवेशनामध्ये दोन खासगी विधेयके सादर केली असल्याची माहिती आमदार जीत आरोलकर यांनी दिली आहे.
आमदार आरोलकर यांनी सांगितले मांद्रे मतदारसंघातील अस्तित्व अबाधित राखण्यासाठी आणि पुढच्या पिढीला डोंगर माळराने शेत जमिनी सर्व प्रकारच्या जमिनी ज्या पद्धतीने जाणकार पूर्वजांनी राखून ठेवलेले आहे त्या तशाच राखून पुढच्या पिढीसाठी ठेवाव्यात यासाठी आपण सरकार दरबारी प्रयत्न करत असून नगर नियोजन कायद्यातील कलम ३९(अ) मध्ये दुरुस्ती करण्यासाठी एक खासगी विधेयक आणि संवेदनशील क्षेत्रासाठी स्वतंत्र खासगी विधेयक सादर केल्याची माहिती त्यांनी दिली.
मांद्रेतील अनेक डोंगर आणि शेतजमिनी बिगर गोमंतकीयांनी विकत घेतल्या असून, नो डेव्हलपमेंट झोनमधील जमिनींचे रूपांतर करण्याचे प्रकार समोर आले आहेत. बाहेरील व्यक्तींनी जमिनी बळकावून त्या रूपांतरित करणे, हे स्थानिक हिताच्या विरोधात आहे. याचा गोमंतकीयांना कोणताही फायदा होणार नाही, म्हणूनच आमचा याला पूर्ण विरोध आहे, असे आरोलकर यांनी ठामपणे सांगितले.