प्रायश्चित्त म्हणून दरवर्षी चोरोत्सव साजरा करण्याची परंपरा

वाळपई : सत्तरी तालुक्यातील झर्मे या ऐतिहासिक गावात पारंपरिक चोरोत्सव मंगळवार, दि. ३ मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे. अनेक वर्षांपासून या गावात हा उत्सव साजरा करण्याची परंपरा प्रचलित असून होळीच्या दुसऱ्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी गोव्याच्या विविध भागांतून भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शेकडो वर्षांपूर्वी एक कुटुंब परगावी काम करून हिरे-माणके-मोती अशी संपत्ती घेऊन आपल्या गावी जात असताना झर्मे येथे मुक्कामाला थांबले. त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीमुळे गावकऱ्यांना संशय आला. त्यांच्याकडील संपत्ती पाहून ते चोर असावेत, अशा संशयातून तत्कालीन गावकऱ्यांनी त्या कुटुंबातील पुरुष आणि महिलांची हत्या केल्याची आख्यायिका सांगितली जाते. काही काळानंतर मृतांचे नातेवाईक गावात आले आणि त्यांनी ते चोर नसून कष्टाने कमावलेले धन असल्याचे स्पष्ट केले. आपली चूक समजल्यानंतर गावकऱ्यांनी त्या कुटुंबाच्या स्मरणार्थ आणि केलेल्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून दरवर्षी चोरोत्सव साजरा करण्याची परंपरा रूढ झाली.
झर्मे गावातील चोरोत्सव गोव्यात सुप्रसिद्ध मानला जातो. पारंपरिक विधीनुसार आठ ‘चोरां’चे प्रतीकात्मक स्वरूपात दफन करण्याची पद्धत येथे प्रचलित आहे. ग्रामस्थांच्या मते, चोरोत्सव हा केवळ परंपरा नसून गावाची वेगळी ओळख आहे. शेकडो वर्षांपूर्वी पूर्वजांनी सुरू केलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने व उत्साहाने साजरी केली जाते. देवस्थान समिती, ग्रामस्थ आणि तरुण मंडळी यांच्या सक्रिय सहभागामुळे उत्सवाला विशेष रंगत येते. एकूणच, परंपरा, श्रद्धा आणि इतिहासाची सांगड घालणारा झर्मे गावाचा चोरोत्सव पाहण्यासाठी यंदाही मोठी गर्दी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शेकडो वर्षांच्या चुकीचे प्रायश्चित्त
या उत्सवात आजही त्या घटनेचे प्रतीक म्हणून विशिष्ट विधी केले जातात. आपल्या चुकीवर पांघरूण घालण्यासाठी त्याकाळी त्या मृत व्यक्तींना चोर ठरवण्याचा जो प्रयत्न झाला, त्याचेच चित्रण या उत्सवात दिसते. यात सहभागी होणाऱ्यांच्या गळ्यात नारळाच्या माळा घातल्या जातात आणि हातात कोंबडे दिले जाते. जमिनीमध्ये पुरुषांना मानेपर्यंत पुरून घेण्याचे दृश्य हा या उत्सवाचा सर्वात थरारक अनुभव असतो.