राज्यात ‘सर्व्हायकल कॅन्सर’ येणार नियंत्रणात

‘एचपीव्ही’ लसीकरणास सुरुवात : १४ वर्षांच्या सुमारे १३ हजार मुलींना देणार लस मोफत


3 hours ago
राज्यात ‘सर्व्हायकल कॅन्सर’ येणार नियंत्रणात

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आरोग्य खात्यातर्फे सर्व्हायकल कॅन्सर रोखण्यासाठीच्या (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) एचपीव्ही लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली आहे. यानुसार राज्यातील १४ वर्षांच्या सुमारे १३ हजार मुलींना लस देण्यात येणार आहे. एकदाच घ्यावी लागणारी ही लस पूर्णपणे मोफत असणार आहे. यामुळे राज्यातील सर्व्हायकल कॅन्सर नियंत्रणात येणार आहे. ही मोहीम केंद्र सरकारने सुरू केलेल्या देशव्यापी मोहिमेचा एक भाग आहे. राज्य कुटुंब कल्याण केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी ही माहिती दिली.
साधारणपणे ८५ ते १०० टक्के वेळेस गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे होतो. याची लागण शारीरिक संबंधांतून होत असते. यामुळे वयात आलेल्या मुलींना शारीरिक संबंधात सक्रिय होण्यापूर्वी ही लस दिली जाते. अनेकदा हा व्हायरस (विषाणू) शरीरात दाखल झाल्यावर शरीराची प्रतिकारशक्ती त्याला निष्क्रिय करते. मात्र प्रतिकारशक्ती कमी असल्यास या व्हायरसची लागण होते. याला कॅन्सरपूर्वीचा ‘लीजन’ टप्पा असे म्हटले जाते.
लीजन टप्पा ते कॅन्सरची लागण होण्यास १० ते १५ वर्षांचा कालावधी लागू शकतो. एखाद्या महिलेला २५ व्या वर्षी व्हायरसची लागण झाली, तर तिला साधारपणे वयाच्या ३५ ते ४० वर्षांपर्यंत कॅन्सर होऊ शकतो. यामुळे लहान वयातच लसीकरण केले तर हा कर्करोग होण्याची शक्यता ९३ ते १०० टक्क्यांनी कमी होते. याशिवाय आरोग्य खात्यातर्फे कॅन्सर तपासणीदेखील करण्यात येत आहे. महिलांमध्ये लीजन टप्प्यातील कॅन्सर असल्याचे आढळल्यास त्यावर उपचार केले जातात. लीजन टप्प्यातील कॅन्सर पूर्णपणे बरा होतो, असे डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी सांगितले.
राज्यात महिन्याला ९ जणींना लागण
राज्यात २०१९ ते २०२३ या पाच वर्षांच्या कालावधीत ५४० महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाला होता. याचाच अर्थ वरील कालावधीत महिन्याला सरासरी ९ महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाची लागण झाली होती. २०१४ ते २०२३ दरम्यान गोव्यात ४४१ महिलांचा गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला होता.
लस पूर्णपणे सुरक्षित
लसीच्या पूर्वचाचण्या झाल्या असून ती पूर्णपणे सुरक्षित आहे.
लसीकरणामुळे मासिक पाळी अथवा प्रजनन क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही.
लसीकरण सक्तीचे नाही.
सर्व सरकारी इस्पितळात ही लस उपलब्ध असेल.