सुकाणू समितीकडे मुख्यमंत्र्यांची चर्चा

पणजी : लोकाभिमुख आणि सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प (Budget) मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी लोकांकडून सूचना मागवण्यासहीत उद्योग तसेच इतर संघटनांकडे मी चर्चा केली, असे मुख्यमंत्री (Chief Minister) डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. सुकाणू समितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.
विधानसभेचे (Assembly) अर्थसंकल्पीय अधिवेशन ६ मार्च पासून सुरू होते. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच ६ मार्चला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे २०२६-२०२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अधिवेशन २७ मार्च पर्यंत चालणार.
अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी भाजपच्या (BJP) सुकाणू समितीची बैठक झाली. बैठकीत अर्थसंकल्पासहीत फोंडा पोटनिवडणूक, पणजी महापालिका निवडणूक तसेच यापुढे होणारी नगरपालिका निवडणुकीवर चर्चा झाली. अर्थसंकल्पाविषयी पक्षाने काही मागण्या सरकारकडे केल्या आहेत. या मागण्यांचा समावेश अर्थसंकल्पात होणार, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
बैठकीला प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत, अॅड. नरेंद्र सावईकर, क्रीडामंत्री रमेश तवडकर आणि इतर सदस्य उपस्थित होते. भाजप सरकार हे लोकांसाठी आहे. लोकांसाठी ज्या योजना आहेत, त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. सामान्य लोकांसाठी अर्थसंकल्प असावा, अशी मागणी बैठकीत केल्याचे अध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.