
नवी दिल्ली : देशभरात वाढणारे वाहन अपघात (Vehicle accident) व त्यामुळे जाणारे बळी, जायबंदी होणे; याची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) घेतली आहे. रस्त्यांवर (Roads) वाहने चालवताना दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवल्यास संबंधित वाहन चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला जाऊ शकतो, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजय कुमार आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने आदेश दिला आहे.
रस्ते नियमावली १९८९ मधील नियम २३ चा उल्लेख करीत खंडपीठाने नमूद केले आहे की, पुढील वाहन चालक अचानक ब्रेक दाबू शकतो ही शक्यता लक्षात घेऊनच चालकाने वाहनापासून आवश्यक अंतर ठेवणे गरजेचे आहे. उच्च न्यायालयाने टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि इतरांच्या बाजूने दिलेल्या निर्णयाविरोधात ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेला परवानगी देताना न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
१९ मे २०१३ रोजी रात्री ११ वाजता झालेल्या एका अपघातात एका ट्रकने समोरील ट्रेलरला मागून धडक दिली होती. हा अपघात चालकाने अचानक ब्रेक लावल्याने घडल्याचा दावा करण्यात आला होता. अपघातात ट्रकचा क्लीनर गंभीर जखमी झाला होता.
ट्रेलरने अचानक ब्रेक लावल्यामुळे हा अपघात घडल्याचा दावा करण्यात आला होता. विमान कंपनी टाटा एआयजीचे म्हणणे होते की, ट्रेलर चालकाच्या निष्काळजीपुणामुळे हा अपघात घडला. ओरिएंटल इन्शुरन्सतर्फे युक्तीवाद करताना ट्रक चालक वाहनांमधील पुरेसे अंतर राखण्यात अयशस्वी ठरल्याने अपघात घडल्याचे म्हटले होते.
मागच्या वाहनाने पुरेसे अंतर ठेवले असते तर पुढच्या गाडीने अचानक ब्रेक लावूनही अपघात टाळता आला असता. पुढच्या वाहन चालकाने अचान ब्रेक लावल्याचे कारण सांगून चालकाला अपघाताच्या जबाबदारीतून मुक्त होता येणार नाही. रस्ते सुरक्षेच्या नियमांचे पालन न करणे हा आता थेट गुन्ह्याचा भाग ठरू शकतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले.