तंजावर महामार्गावर घडली घटना. व्हिडिओ फुटेज आली समोर.

तंजावर: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते आणि 'तमिलगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाचे संस्थापक विजय यांच्या रॅलीदरम्यान बुधवारी एक भीषण अपघात घडला. त्रिची-तंजावर महामार्गावर विजय यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांच्या ताफ्याचा पाठलाग करणाऱ्या अनेक चाहत्यांच्या दुचाकींना अपघात झाला असून, यामध्ये अनेक तरुण जखमी झाले आहेत. या अपघाताचे अंगावर काटा आणणारे चित्रण कॅमेऱ्यात कैद झाले असून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
विजय हे त्रिचीहून तंजावरमधील चेंगीपट्टी येथे पक्षीय बैठकीसाठी जात असताना हा प्रकार घडला. महामार्गावर आपल्या आवडत्या ताऱ्याला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. मात्र, काही उत्साही चाहत्यांनी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून आणि हेल्मेट न घालता विजय यांच्या वाहनाचा दुचाकीवरून वेगाने पाठलाग करण्यास सुरुवात केली. याच गडबडीत एकापाठोपाठ एक अनेक दुचाकी एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला. या अपघाताची तीव्रता इतकी होती की, रस्त्यावर जखमींचा खच पडला होता आणि त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकांच्या सतत फेऱ्या सुरू होत्या. एका घटनेत एका तरुणाच्या कवटीला गंभीर इजा झाली असून तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

चेंगराचेंगरी आणि मृत्यूच्या घटनांची पुनरावृत्ती
विजय यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अशा प्रकारच्या दुर्घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी करूर येथील रॅलीदरम्यान मोठ्या प्रमाणावर गर्दी जमल्याने चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली होती. इतकेच नव्हे तर, काही आठवड्यांपूर्वी सालेम येथे आयोजित रॅलीत सहभागी झालेल्या एका चाहत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. अशा प्रकारच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे आता विजय यांच्या 'टीव्हीके' पक्षाच्या व्यवस्थापनावर आणि गर्दी नियंत्रणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय यांनी वेळोवेळी आपल्या चाहत्यांना शिस्त पाळण्याचे आवाहन केले आहे. वेल्लोर येथील एका कार्यक्रमात त्यांनी चाहत्यांना आपल्या वाहनाचा पाठलाग न करण्याची विनंतीही केली होती, परंतु चाहत्यांच्या अफाट वेडापायी या आवाहनांना हरताळ फासला जात असल्याचे बुधवारी पुन्हा एकदा दिसून आले. राजकीय प्रवासाची सुरुवात करत असताना चाहत्यांचा हा अतिउत्साह आणि सुरक्षेकडे होणारे दुर्लक्ष विजय यांच्या राजकीय प्रतिमेवर सावट टाकत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.