आखातात अडकले हजारो भारतीय; नातेवाईकांना चिंता

मायदेशी आणण्यासाठी स्पाईसजेट, एअर इंडिया, इंडिगोची उड्डाणे; सरकारकडून नियोजन

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
31 mins ago
आखातात अडकले हजारो भारतीय; नातेवाईकांना चिंता

नवी दिल्ली : अमेरिका (America), इस्त्रायल (Israel), इराण (Iran) युद्धानंतर आखाती देशांमध्ये तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हवाई क्षेत्र आखाती देशांनी बंद केले आहे तर काही देशांनी निर्बंध लागू केले आहेत. त्याचा परिणाम जगभरातील विमान सेवेवर झाला आहे.

गेल्या दोन दिवसांमध्ये भारतातील सुमारे ६०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय (International) उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. युद्धाचा परिणाम अमेरिकेच्या विमान सेवेवरही झाला आहे. एकूण या परिस्थितीमुळे दिल्ली, मुंबईसह (Mumbai) भारतातील (India) विविध विमानतळांवर शेकडो प्रवासी अडकले आहेत व त्यांच्या नातेवाईकांची चिंता वाढली आहे.

दुबई तसेच आखाती देशांतील इतर शहरांमध्ये अडकलेले २,१०० पेक्षा जास्त भारतीय नागरिक चेन्नई, मुंबई व इतर विविध शहरांमध्ये परतले. मायदेशी पोहोचताच त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. बिकट स्थितीतून मायदेशी परतल्यानंतर त्यांचे कुटुंबीय व नातेवाईक आनंदी झाले. 

नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ला झाल्यानंतर देशातील विमान कंपन्यांनी दीड हजार पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली आहेत.

मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या चार प्रमुख विमानतळांवरून आज २५० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली. मुंबईतून १०७, दिल्लीतून ८०, बंगळुरूतून ४२ उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यामुळे विविध विमानतळांवर आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यासाठी निघालेले प्रवासी अडकून पडले आहेत व त्यांची तारांबळ उडाली आहे. 

अबुधाबीतून आलेली विमाने दिल्ली, मुंबईत उतरली

अडकून पडलेल्या हजारो प्रवाशांना आखाती देशांतून मायदेशी परत आणण्यासाठी मर्यादित स्वरुपात विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. स्पाईसजेट, इंडिगो या स्वदेशी विमान कंपन्यांसोबत इमिरेट्स, ‘एतिहाद’सह काही परदेशी कंपन्यांच्या विमानातून भारतीय मायदेशी आले.

जगभरातील विमान सेवेवर परिणाम

अमेरिका, इस्त्रायल, इराण युद्धामुळे आखातातील विविध देशांमध्ये वेगवेगळ्या देशांतील सुमारे २ लाखांपेक्षा जास्त नागरिक अडकले आहेत. ३ दिवसांमध्ये आखाती देशांमधील १५ हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. मर्यादित स्वरूपात उड्डाणे सुरू आहेत. ब्रिटनचे एक लाख, इंडोनेशियाचे ५८ हजार, जर्मनीचे ३० हजार व इतर विविध देशांचे हजारो नागरिक आखाती देशांत अडकले आहेत.

५८ विमानांमधून आज भारतीयांना परत आणणार

देशातील विमान कंपन्यांनी बुधवारी ४ मार्च रोजी आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणण्यासाठी ५८ उड्डाणांचे नियोजन केले आहे. स्पाईसजेट, इंडिगो, एअर इंडिया या कंपन्यांचा त्यात समावेश आहे. इंडिगोने ३०, एअर इंडिया व एअर इंडिया एक्स्प्रेसने २३ उड्डाणांचे नियोजन केले आहे. मदिना, मस्कत आणि ग्रीसमधील अॅथेन्स इत्यादी शहरांमधून ही विमाने उड्डाण घेणार आहेत. 


हेही वाचा