विरोधकांचे मतदारसंघच नव्हे, तर ग्रामीण भागातील उमेदवारांनाही मिळाली नोकरी

कर्मचारी संघटनेकडून आयोगातर्फे कर्मचारी निवडीचे स्वागत

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
30 mins ago
विरोधकांचे मतदारसंघच नव्हे, तर ग्रामीण भागातील उमेदवारांनाही मिळाली नोकरी

पणजी : कर्मचारी भरती आयोगामार्फत (GSSC) आतापर्यंत १११७ उमेदवारांची सरकारी (Government) नोकरीसाठी निवड झाली आहे. निवड झालेले उमेदवार मंत्र्यांच्याच मतदारसंघांतील किंवा शहरी भागातील नाहीत, विरोधकांच्या मतदारसंघातील उमेदवारांना सुद्धा मोठ्या प्रमाणात संधी मिळाली आहे.

तसेच प्रियोळ, सांगे, काणकोण (Canacona), पेडणे (Pernem), मांद्रे (Mandrem), मये (Mayem) या ग्रामीण मतदारसंघांतील बेरोजगारांची सुद्धा नोकरीसाठी निवड झालेली आहे. गुणवत्ता व पारदर्शकतेवर आधारीत निवड झाल्याने राज्यातील सर्व स्तरातील तरूणांना नोकरीची संधी मिळाली आहे. 

अखिल गोवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अभय मांद्रेकर व माजी अध्यक्ष जॉन नाझारेथ या दोघांनीही या प्रक्रीयेचे स्वागत केले आहे. कर्मचारी भरती आयोगामुळे राज्यातील सर्वांना नोकरीची समान संधी मिळत आहे. तसेच गुणवान व पात्र उमेदवारांचा सरकारी नोकरीत भरणा होत आहे. यामुळे विविध खात्यांकडून जनतेला दर्जेदार सेवा मिळणे शक्य होईल, असे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अभय मांद्रेकर यांनी म्हटले आहे.

सरकारी नोकरी म्हणजे वशिलेबाजी. मंत्र्यांच्या मर्जीतील किंवा त्यांच्याच मतदारसंघांतील तरूणांना सरकारी नोकरी मिळणे शक्य असते, असा समज रूढ झाला होता. आज वरचा अनुभव पाहता हा समज बऱ्याच अंशी बरोबरही होता.

परंतु कर्मचारी भरती आयोगामुळे हा समज चुकीचा ठरला आहे. कर्मचारी भरती आयोगातर्फे निवड झालेले उमेदवार सर्व मतदारसंघांतील आहेत. फोंडा मतदारसंघातून सर्वाधिक ६३ जणांची निवड झालेली असली तरी ग्रामीण मतदारसंघ असलेल्या प्रियोळमधून ६० जणांची निवड झालेली आहे.

कुंकळ्ळी, हळदोणा व केपे हे मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. या मतदारसंघातून अनुक्रमे २८, १२ व ४५ जणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. आरजीचे विरेश बोरकर आमदार असलेल्या सांत आंद्रे मतदारसंघातून १९ जणांची निवड झालेली आहे.

फातोर्डा (गोवा फॉरवर्ड) मतदारसंघातून १० तर बाणावली व वेळ्ळी मतदारसंघांतून अनुक्रमे ३ व ७ उमेदवारांची निवड झालेली आहे. सांगायचे तात्पर्य म्हणजे विरोधी मतदारसंघांतील उमेदवारांना देखील गुणवत्तेनुसार संधी मिळालेली आहे.

सर्वांना नोकरीची समान संधी : अभय मांद्रेकर

कर्मचारी भरती आयोगामार्फत कर्मचाऱ्यांची भरती झाल्याने सर्वांना नोकरीची समान संधी उपलब्ध झाली आहे. गुणवत्तेला प्राधान्य मिळाल्याने खात्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल. फक्त विविध खात्यात बरीच वर्षे जे नोकरी करीत आहेत, त्याना योग्य वेळी बढती मिळायला हवी. त्यांच्यावर अन्याय होता कामा नये; असे अ. गो. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अभय मांद्रेकर यांनी सांगितले. 

‘त्यांना’ एलडीसी पदासाठी अर्ज करण्यास निर्बंध हवेत : नाझारेथ 

कर्मचारी भरती आयोगामार्फत कर्मचाऱ्यांची भरती झाल्याने; गुणवान उमेदवारांना न्याय मिळतो. फक्त एलडीसी पदासाठी वकील तसेच उच्च शिक्षा विभूषित उमेदवार अर्ज करतात. यामुळे दहावी, बारावी झालेल्यांना नोकरीची संधी मिळत नाही. यासाठी अधिक शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना एलडीसी पदासाठी अर्ज करण्यावर निर्बंध घालायला हवेत; असे सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जॉन नाझारेथ यांनी सांगितले. 


हेही वाचा