उत्तर गोव्याच्या तुलनेत दक्षिण गोव्यात शेतकामांसाठी अधिक रोजंदारी

सांख्यिकी खात्याचा अहवाल : नांगरणी, मळणी, तण काढण्यासाठी अधिक रोजंदारी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
उत्तर गोव्याच्या तुलनेत दक्षिण गोव्यात शेतकामांसाठी अधिक रोजंदारी

पणजी : राज्यात कृषी क्षेत्राशी निगडित कामांसाठी कामगारांची मागणी वाढली आहे. प्रामुख्याने नांगरणी, मळणी, तण काढणे अशी कामे करणाऱ्या कामगारांना तुलनेने अधिक रोजंदारी मिळते. नियोजन आणि सांख्यिकी खात्याने जारी केलेल्या अहवालानुसार, नांगरणी कामासाठी सरासरी ७५८ रुपये, तर मळणी कामासाठी ७०१ रुपये रोजंदारी दिली जाते. उत्तरेच्या तुलनेत दक्षिण गोव्यात तुलनेने अधिक रोजंदारी दिली जाते. यासाठी सांख्यिकी खात्याने ९ प्रकारच्या कृषी कामांसाठी देण्यात येत असलेल्या रोजंदारीची माहिती गोळा केली आहे.
खात्याने या सर्वेक्षणासाठी प्रत्येक तालुक्यातील ४ गावांची निवड करून तिथे सर्वेक्षण केले. यामध्ये खड्डे खणणे, नांगरणी, पीक लावणी, पाणी देणे, खत घालणे, तण काढणे, कापणी, मळणी व अन्य कामांसाठी दिल्या जात असणाऱ्या रोजंदारीची माहिती गोळा केली. यामध्ये ग्रामीण भागातील एकूण ४८ गावांची निवड करून तिथे हे सर्व्हेक्षण करण्यात आले. यामध्ये महिला आणि पुरुष कामगारांची माहिती घेण्यात आली. वरील सर्व प्रकारच्या रोजंदारी कामासाठी पुरुषांना उत्तर गोव्यात सरासरी ६५५ रुपये, तर दक्षिण गोव्यात सरासरी ७३४ रुपये दिले जातात. संपूर्ण गोव्याची रोजंदारीची सरासरी ८७८ रुपये आहे.
राज्यात पुरुष कामगारांना खड्डे खणण्यास ६७४ रुपये, शेतातील तण काढण्यासाठी ६५५ रुपये, पीक कापणीसाठी ६४३ रुपये, पीक लावणीसाठी ६११ रुपये, खत घालण्यास ६२८ रुपये, पाणी घालण्यास ५९७ रुपये, तर अन्य कृषी कामांसाठी ६२९ रुपये रोजंदारी दिली जाते. पुरुषांच्या तुलनेत महिला कामगारांना मिळणारी रोजंदारी १०० ते ५०० रुपयांनी कमी आहे.
..
महिला कामगारांना सरासरी
४४७ रुपये रोजंदारी
संपूर्ण राज्यात महिला कामगारांना सरासरी ४४७ रुपये रोजंदारी देण्यात येत असल्याचे अहवालात नमूद केले आहे. उत्तर गोव्यात पुरुष कामगारांना सरासरी ५३९ रुपये, तर दक्षिणेत सरासरी ७३४ रुपये रोजंदारी मिळते. उत्तर गोव्यात महिला कामगारांना ४०८ रुपये, तर दक्षिणेत ४९१ रुपये रोजंदारी मिळत असल्याचे अहवालात नमूद केले आहे.