पेठेची जत्रा

मुळगावची पेठ मये गावात नेत असताना पोर्तुगीज अधिकारी पेठेचा कार्यक्रम बंद पाडण्यासाठी तेथे आले. पेठ वाजत गाजत ढोल-ताशांच्या गजरात मयेला चालली होती. पण आपण आलो कशासाठी आणि करतो काय याचे भान त्यांना राहिले नाही. तेही ढोल-ताशांच्या तालावर धुंद होऊन हरेंss हरें करत नाचू लागले...

Story: जत्रा |
58 mins ago
पेठेची जत्रा

डिचोली तालुक्यात मुळगाव येथे श्री केळबाईचे मंदिर आहे. देवी हत्तीवर विराजमान झालेली आहे. चैत्र शुद्ध पंचमीला केळबाईची जत्रा भरते. ही जत्रा पेठेची जत्रा 

या नावाने संपूर्ण गोमंतकात प्रसिद्ध आहे. श्रीदेवी लईराई, केळबाई, मिराबाई, मोरजाई, शितलादेवी, महामाया, अंजादीपा व एकुलता सर्वात धाकटा भाऊ खेतोबा ही आठही भावंडे घाटमाथ्यावरून आल्याचे सांगण्यात येते. गिरोडे, मोर्ले, मावळींगे, बोर्डे, डिचोली अशी फिरत फिरत ती या ठिकाणी पोहोचली. विश्रांतीसाठी काही काळ तेथे राहिली व नंतर आपल्या इच्छित स्थळी वास्तव्यास गेली.

या सात ऋषीकन्यांपैकी थोरली केळबाई तिला मुळगावचा निसर्गरम्य परिसर आवडल्याने ती मुळगावमध्ये स्थायिक झाली. महामाया जवळच असलेल्या मये गावात राहिली. या बहिणींचे वैशिष्ट्य म्हणजे त्या एकमेकींच्या जत्रेला जातात. एकमेकींना भेट म्हणून फुले, तेल पाठवतात. मयेच्या देवी महामायेने थोरल्या बहिणीला वचन दिले की, मी तुझी वर्षातून एकदा जत्रा करते व तुला माझ्याकडे दोन दिवस राहायला नेते. वचनाप्रमाणे चैत्र शुद्ध पंचमीला रात्री शिरगावकर, वायंगणकर, मयेकर मुळगावात येऊन जत्रा सुरू करतात. मयेचा माल्याचा मोड मुळगावात येऊन पेठ भरतो. मयेकर पेठ डोक्यावर घेतात. माल्याचा मोड पुढे तर मुळगावचा मोड मागे असतो. पेठ घेऊन नाचत नाचत देवीला मयेला घेऊन जातात. देवी दोन रात्री तेथे मुक्कामाला राहते व तिसऱ्या दिवशी निवासस्थानी परत येते.

देवी लईराई, महामाया, केळबाई या तिन्ही बहिणींच्या जत्रेत व्रतस्थ धोंडांना महत्त्वाचे स्थान आहे. देवी केळबाई गुढीपाडव्यापासून तर नवीन धोंड अमावास्येपासून सोवळे पाळतात. प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नऊ दिवस ते शाकाहारी जेवण जेवतात. जत्रेच्या दिवशी संपूर्ण दिवस त्यांचा उपवास असतो.

जत्रेच्या दिवशी सकाळी मंदिरात गाऱ्हाणे घालतात. त्यानंतर व्रतस्थ धोंड देवतेच्या पवित्र तळीत आंघोळ करतात. सोवळे पाळणाऱ्यांनाच या तळीत आंघोळ करता येते. अंघोळीनंतर दान करण्याची प्रथा आहे याला 'पचकुर' असे म्हटले जाते. परंपरेनुसार देवीचे सेवेकरी जमिनीवर कपडा घालून बसलेले असतात. धोंडगण आपल्या इच्छेनुसार जत्रेसाठी म्हणून त्यांना पैसे ठेवतात व नंतर देवीची भेट घेतात. 

रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान सर्व धोंडगण मंदिरात जमा होतात. त्यांच्या हातात बेतकाठी असते. बेतकाठी रंगीत रेशमी कापडाच्या गोंडानी सजवलेली असते. बेतकाठी घेऊन वाद्याच्या तालावर हरेंss हरें असे म्हणत ते नाचतात. प्रत्येक धोंडाला पाच फेरे मारावे लागतात. गावचे लोकच हे व्रत अंगिकारतात. चौगुल्यांपैकी गाडांना धोंड नाचायला मिळत नाही ते पेठ नाचवतात. व्रतस्थ धोंड गळ्यात अबोली फुलांचे वळेसार (हार) घालतात. श्री देवी लईराई जत्रेत ज्याप्रमाणे सर्वत्र मोगरीचे कळे पहावयास मिळतात त्याचप्रमाणे केळबाई जत्रेत जिकडे पाहावे तिकडे अबोलीचे वळेसार दृष्टीस पडतात. देवी केळबाईला अबोलीची फुले भारी प्रिय. त्यामुळे देवीला नवस तेथील अबोली फुलांचे असतात. देवीची पेठ या अबोली फुलांच्या वळेसरने सजवली जाते. रात्री साडेबाराच्या दरम्यान सारा धोंडगण मयेच्या मानकऱ्यांना आणण्यासाठी देवस्थानाकडे जातो. तेथे मयेचा मोड व चौगुले येऊन राहिलेले असतात. त्यांना वाजत गाजत मंदिराकडे आणले जाते. मोडाच्या पायावर पाणी घालून त्याला सन्मानपूर्वक मंदिरात नेतात. शिवाय त्यांच्याबरोबर आलेल्या चौगुल्यांना मानकऱ्यांना आदरपूर्वक सन्मान केला जातो. केळबायच्या मंदिरात पेठ सजवून ठेवलेली असते. बेतकाठीपासून तयार केलेल्या या पेठेची मयेहून आलेले मानकरी हळदकुंकू वाहून पूजा करतात. मयेचा मोड मंदिरात असलेले ब्रह्मशक्ती, शिवशक्ती, विष्णुशक्ती व आदिशक्ती या देवांचे मुखवटे आणून पेठेत ठेवतो. याला पेठ भरणे असे म्हणतात. पेठ भरल्यानंतर गाऱ्हाणे घातले जाते. मयेचा मोड पेठ गावाच्या सीमेपर्यंत येतो. त्यानंतर मुळगावकर पेठ घेतात. वाटेत शिरगावकरांना कौल दिला जातो. शेतातील वाटेने जात असताना वडाच्या झाडाकडे देवचार देवीला अडवतो अशी अाख्यायिका आहे त्यावेळी देवी त्याच्याकडे अबोलीचा झेला (वळेसार) फेकते. तो झेलण्याच्या गडबडीत देवचार बाजूला होतो आणि देवी धावतच पुढे जाते व ओढणा या ठिकाणी थांबते. याच ठिकाणाहून आठही भावंडे निरनिराळ्या ठिकाणी वास्तव्याला निघाली होती, त्याचे स्मरण म्हणून पेठ तेथे ठेवून उघडली जाते. काही वेळ थांबून पेठ मयेच्या मंदिराकडे प्रयाण करते. पहाटे पाच साडेपाच वाजता पेठ मंदिराकडे पोहोचते. तेथे त्यांचीही एक पेठ असते. दोन्ही पेठा उघडून एकत्र ठेवतात. नंतर पेठा चव्हाट्यावर ठेवतात. 

अष्टमीच्या दिवशी मये गावात माल्याची जत्रा भरते. जत्रेच्या पूर्वी मयेचा मोड व मानकरी मुळगावची पेठ आणून मयेच्या सीमेपर्यंत आणून मुळगावच्या मोडाकडे सुपूर्द करतात. आपल्या देवतेला आणण्यासाठी मुळगावकर मोठ्या उत्साहाने मयेला जातात. डोंगर वाटेने येताना पेठ दाड देवाकडे ठेवतात. नवमीच्या दिवशी सकाळी मानकऱ्यांना कौल देत पेठ मंदिराकडे येते. शेवटी व्रतस्थ धोंडांना कौल देतात. सर्वांना कौल दिल्यानंतर पेठ पेडावर ठेवतात, तेथे पेठ पाच दिवस राहते. या पाच दिवसांत नाटक, दिवजोत्सव व इतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. मुळगावकरांचे आराध्य दैवत केळबाई हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. 

पोर्तुगीजांच्या राजवटीत बाटाबाटीच्या वेळी अनेक देवदेवता केळबाईच्या आश्रयाला येऊन राहिल्या. आख्यायिकेनुसार धर्मांध पोर्तुगीजांनी हिंदू लोकांचा धार्मिक छळ करून हिंदूंच्या मंदिरांची नासधूस केली. मंदिरातील मूर्तीची तोडफोड, विटंबना केली. देवांचे उत्सव, धार्मिक कार्यक्रम यावर बंदी आणली. अशा परिस्थितीमध्ये हिंदू बांधवांनी धीर न सोडता देवावर भार टाकून आपल्या देवतांचे उत्सव, जत्रा चालू ठेवल्या. त्यानुसार मुळगावची पेठ मये गावात नेत असताना पोर्तुगीज अधिकारी पेठेचा कार्यक्रम बंद पाडण्यासाठी तेथे आले. पेठ वाजत गाजत ढोल-ताशांच्या गजरात मयेला चालली होती. पुढे सारा धोंडगण वाद्याच्या तालावर हरेंss हरेंच्या गजरात हातात रंगीबेरंगी बेतकाठ्या घेऊन नाचत होता. सर्वत्र आनंदीआनंद पसरला होता. देवतेचा महिमा अगाध म्हणून की काय आपण आलो कशासाठी आणि करतो काय याचे भान त्यांना राहिले नाही. देवीने त्यांच्यावर भूल घातली होती. पेठ अडवून जत्रा बंद करण्याचे सोडून ढोल-ताशांच्या तालावर धुंद होऊन हरेंss हरें करीत नाचू लागले. देवीच्या करणीने भयभीत झालेल्या पोर्तुगीजांनी तेथून काढता पाय घेतला. त्या दिवसापासून केळबाईच्या देवस्थानाकडे फिरण्याचा धीर त्यांना झाला नाही. केळबाई देवस्थान भयमुक्त झाले, पोर्तुगीज देवीचा आदर करू लागले. जत्रा उत्सवाला विरोध करणारे पोर्तुगीज सहकार्य देऊ लागले. त्यामुळे बाटवाबाटवीला घाबरून गेलेली दैवते केळबाईच्या आश्रयाला येऊन राहिली. म्हणतात ना, ‘आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना.’