‘आमी पणजेकार’तर्फे घरोघरी भेटींवर भर : उत्पल पर्रीकर

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
47 mins ago
‘आमी पणजेकार’तर्फे घरोघरी भेटींवर भर : उत्पल पर्रीकर

पणजी : पणजी महापालिका (Muncipal Corporation of Panjim)  निवडणुकीत (Election) ‘आमी पणजेकार’ पॅनलतर्फे घरोघरी जाऊन मतदारांना भेटी देण्यावर भर देण्यात येत आहे. रायबंदर (Raibandar) येथील भेटी पूर्ण झाल्या आहेत. मळा येथील ५० टक्के घरांना भेटी दिल्या आहेत.

कालपासून पणजी भागात भेटी सुरू झाल्या आहेत. पॅनेलचे उत्पल पर्रीकर यांनी ही माहिती दिली. मंगळवारी पणजी शिगमोत्सवानिमित्त येथील महालक्ष्मी मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थितांसोबत रंग खेळला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

पर्रीकर म्हणाले की, आम्ही भेट दिलेल्या सर्व भागात काही न काही समस्या आहेत. मागील पाच वर्षे कामे योग्य पद्धतीने झाली नसल्याच्या तक्रारी लोक करत आहेत. रायबंदर येथे मैदानासाठी संपाद‌ित केलेल्या जागेच्या शेजारी नगर नियोजन कायद्यातील ३९ अ नुसार बदल केले जाण्याची शक्यता असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. येथे बांधण्यात आलेल्या जेटीला पुरेशा पायऱ्या नाहीत. त्यामुळे जेटी मच्छीमारांसाठी आहे का व्यावसायिक कारणासाठी याविषयी शंका निर्माण झाली आहे. 

ते म्हणाले, पणजी शहरात देखील अनेक समस्या आहेत. मागील पाच वर्षे आमदार, महापौरांनी शहराचा विचारच केलेला नाही. येथील पार्किंगचा प्रश्न अजूनही कायम आहे. सरकार पिपिपी तत्त्वावर पीडब्ल्यूडी गॅरेज येथे व्यावसायिक बांधकाम प्रकल्प आणू पाहत आहे.

याऐवजी येथे हायड्रॉलिक पार्किंग स्टेशन करता आले असते. ही जागा बाजाराच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे पार्किंगसाठी उपयुक्त ठरली असती. घरोघरी फिरल्याने लोकांच्या समस्या अधिक चांगल्या पद्धतीने समजत आहेत.

हेही वाचा