देवीच्या पुढील चौकात नागाची प्रतिमा ठेवलेली आहे. असे सांगतात की, नागाच्या मूर्ती खाली एक प्रचंड घंटा पुरलेली आहे. त्या घंटेच्या नादाने सर्व संकटे निवारण केली जातात. तिचा नाद ऐकताच देवीचे आठ सहस्त्र गण आणि साडेतीन कोटी भुतावळ संकट निवारण करण्यासाठी सज्ज होतात.

देवदेवतांच्या या पवित्र गोमंतभूमीमध्ये अप्रतिम, भव्य असे श्री कामाक्षी रायेश्र्वराचे मंदिर आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या मंदिराच्या परिसरात पुष्कळ प्राचीन वृक्ष पहावयास मिळतात. मंदिराच्या समोर एक विहीर आहे. देवतांना अभिषेक करण्यासाठी याच विहिरीचे पाणी वापरण्यात येते. मंदिराच्या पुढच्या बाजूला दीपस्तंभ व उंच अशी दीपमाळ आहे. सभामंडपात आठ ते नऊ फूट उंचीच्या दोन समई असून त्यांची तेल पात्र क्षमता पाच लिटरपेक्षा जास्त आहे. आठ नक्षीदार खांबांवर उभा असलेला सभामंडप विविध चित्रे, झुंबर यांनी सजवलेला आहे.
कामाक्षी मंदिराच्या परिसरात श्री लक्ष्मीनारायण, श्री महाडेश्वर, श्री रायेश्वर, श्री कालभैरव, श्री शांतादुर्गा, श्री वेताळ, श्री सटी अशी अनेक मंदिरे आहेत. श्री कामाक्षी देवीची मूळ मूर्ती ही चांदीची आहे. मंदिराचा गाभारा चांदीने मढवलेला असून चांदीच्या सिंहासनावर विराजमान झालेली महिषासुरमर्दिनी रूपातील ही देवी चतुर्भुज आहे. तिने आपला उजवा पाय महिषासुरावर ठेवलेला आहे व डाव्या हाताने त्याचे केस पकडलेले आहेत. देवीच्या पुढील चौकात नागाची प्रतिमा ठेवलेली आहे. ही देवीच्या गणाची जागा. असे सांगतात की, नागाच्या मूर्ती खाली एक प्रचंड घंटा पुरलेली आहे. त्या घंटेच्या नादाने सर्व संकटे निवारण केली जातात. तिचा नाद ऐकताच देवीचे आठ सहस्त्र गण आणि साडेतीन कोटी भुतावळ संकट निवारण करण्यासाठी सज्ज होतात. या स्थानाला गण असे म्हणतात. इथेच देवीला कौल लावला जातो. हे जागृत देवस्थान असा नावलौकिक असल्यामुळे कौल प्रसादासाठी येथे खूप लोक येतात. प्रसादासाठी या मूर्तीस कर्मल वृक्षाच्या पिकलेल्या पानांचे तुकडे लावले जातात.
प्राचीन काळी हे मंदिर राय येथे होते. पोर्तुगीज बाटाबाटीच्या काळात एका कुंभार भक्ताने जीवावर उदार होऊन लपत-छपत जुवारी नदी पार करून मूर्ती शिरोडा गावात आणली. कुंभार भक्ताचा मान व आठवण म्हणून देवीच्या दीपोत्सवाच्या दिवशी पहिला दीप प्रज्वलित करून देवीला अर्पण करण्याचा मान कुंभार समाजातील त्यांच्या वंशजांना असतो.
या मंदिरामध्ये वर्षभर उत्सव साजरे होत असतात. वसंत पूजा, महाशिवरात्र, त्रिपुरारी पौर्णिमा, वनभोजन, अमावास्या वगैरे. प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला येथे खूप गर्दी असते. अमावस्येच्या दिवशी देवीची पूजा करून उपवास केल्यास इच्छित फलप्राप्ती होते, असा देवीचा नावलौकिक असल्यामुळे या दिवशी भाविक येथे गर्दी करतात.
आख्यायिकेनुसार असे सांगितले जाते की, आसाम हे श्री कामाक्षी देवीचे मूळ स्थान आहे. आसाम राज्यातील गुवाहाटी येथून जवळजवळ तीन मैलावर नीलाचल पर्वतावर कामाक्षीचे मंदिर आहे. ते पवित्र तीर्थक्षेत्र असून कामाख्या नावाने ओळखले जाते. नीलाचल पर्वताला शिवाचे प्रतीक मानले जाते. देवी गोव्यात का आली, तर सासष्टी तालुक्यातील राय गावामध्ये श्री लक्ष्मीनारायण, श्री रायेश्वर, श्री शांतादुर्गा या देवतांचे मंदिर होते. त्या मंदिरात अग्निमुख नावाचा ब्राह्मण पूजा पाठ करून आनंदाने राहत होता. त्याचा मुलगा गुणाकर वडिलांना कामात शक्य तेवढी मदत करीत असे. एक दिवस वडिलांनी त्याला समिधा आणण्यासाठी रानात पाठवले. तो ज्या अरण्यात समिधा आणण्यासाठी गेला, त्या अरण्यात महिष नावाचा अति पराक्रमी राक्षस राहत होता. गुणाकर समिधा काढत असताना अकस्मात महिष राक्षसाशी त्याची गाठ पडली. गुणाकराची भीतीने गाळण उडाली. तो राक्षसाच्या पाया पडून गयावया करू लागला. पण अजिबात दयामाया न दाखवता राक्षसाने त्याला जिवंत गिळून टाकले. बऱ्याच उशिरापर्यंत गुणाकर घरी आला नाही म्हणून ब्राह्मण त्याच्या शोधार्थ जंगलात गेला. तेथे त्याला काढून ठेवलेल्या समिधा दिसल्या. त्या पाहून मुलावर काही तरी भयंकर संकट कोसळल्याचे त्याच्या ध्यानात आले. तो तसाच पुढे गेला. इतक्यात सारे जंगल दणाणून सोडणारा आवाज करीत महिष त्याच्या अंगावर चालून आला. पण ब्राह्मणाला तंत्र-मंत्र अवगत असल्याने त्याच्या सहाय्याने त्याने आपली सुटका करुन घेतली. व घरी येऊन राक्षसाचा वध करण्याकरिता आपल्या दैवतांची आराधना करू लागला. त्याच्यावर प्रसन्न होऊन देव रायेश्वर व देव लक्ष्मीनारायणाने त्याला भेट दिली व सांगितले, "हे ब्राह्मणा आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत. पण आम्ही महिषाला मारू शकत नाही. त्याला मारणे केवळ देवी कामाक्षीलाच शक्य आहे तेव्हा तू देवी कामाक्षी आराधना करून तिला प्रसन्न करून घे. आमचा संदेश तिला दे व देवतेला घेऊन इथे ये". हे ऐकून ब्राम्हणाने काहूर देशात प्रयाण केले. कामाक्षी देवीची प्रार्थना करून देवीला प्रसन्न करून घेतले. ब्राह्मणाची भक्ती पाहून देवी कामाक्षी राक्षसाचा वध करण्यासाठी ब्राह्मणासोबत राय येथे येण्यास निघाली असता, वाटेत काळभैरवाची भेट झाली. काळभैरव देवीसोबत राय येथे आला. देवी कामाक्षी आपला वध करण्यासाठी येत आहे हे समजताच राक्षस तिला शरण गेला व ब्राह्मण पुत्राला जिवंत त्यांच्या समोर उभे केले. पिता पुत्राची भेट झाली. श्री देवी कामाक्षी आपले कार्य आटोपून पुन्हा आद्यस्थळी जाण्यास निघाली, तेव्हा ब्राह्मणाने तिला हात जोडून विनंती केली. तिची प्रार्थना करून तो म्हणाला, " देवी माझ्यावर आलेले संकट दूर केले. मला आनंद दिला. त्याचप्रमाणे तू इथे राहून येथील भक्तांची संकटे दूर कर. त्या सर्वांना भयमुक्त कर." देवीने त्या ब्राह्मणाची भक्ती व श्रद्धा पाहून येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. अशा पद्धतीने देवी कामाक्षी नीलाचल पर्वतावरून गोव्यात स्थलांतरित झाल्याची आख्यायिका सांगण्यात येते.