उसप येथील शिमगोत्सवातील करवली उत्सवाला सुरुवात

सात दिवसीय शिमग‍ोत्सवानिमित्त गावात विविध कार्यक्रम

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd March, 11:31 pm
उसप येथील शिमगोत्सवातील करवली उत्सवाला सुरुवात

डिचोली : उसप-डिचोली गावातील पारंपरिक शिमगोत्सवातील ‘करवल्या’ उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सात दिवसांच्या या उत्सवात रंगपंचमीच्या दिवशी साजरा होणारा हा आगळावेगळा कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. नव्या पिढीनेही आपल्या पूर्वजांची ही परंपरा तितक्याच श्रद्धेने जपल्याचे चित्र यावेळीही पाहायला मिळाले.
या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे गावातील दोन लहान मुलांना देवीच्या करवल्या म्हणून सजवले जाते. विशेष विधींद्वारे या मुलांची नाके मोत्यांच्या दाण्यांनी टोचली जातात. ग्रामदेवता श्री सातेरी मंदिरापासून या उत्सवाला सुरुवात होते. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि रोमटामेळासह या करवल्यांची मिरवणूक काढली जाते.
सातेरी मंदिरातून निघालेला हा मेळ नाचत-गाजत चव्हाटेश्वर या ठिकाणी पोहोचतो. येथे करवल्यांना खांद्यावर घेऊन नाचवले जाते. गावातील सुवासिनी मोठ्या श्रद्धेने करवल्यांची ओटी भरून आशीर्वाद घेतात. या पारंपरिक दृश्याचा आनंद घेण्यासाठी केवळ गावकरीच नव्हे, तर परिसरातील पर्यटक आणि भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. सात दिवसांच्या या शिमगोत्सव काळात गावात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.