गेल्या आठवड्यात जीवरक्षकांनी चार पर्यटकांना दिले जीवदान

रशियन मुलीसह बुडणाऱ्या पर्यटकांची सुटका, हरवलेल्या बालकाला केले पालकांकडे सुपूर्द

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd March, 11:49 pm
गेल्या आठवड्यात जीवरक्षकांनी चार पर्यटकांना दिले जीवदान

पणजी : गेल्या आठवड्यात गोव्याच्या विविध समुद्रकिनाऱ्यांवर ‘दृष्टी‍’च्या जीवरक्षकांनी (Drishti lifeguards) समुद्रात बुडणाऱ्या चार पर्यटकांना वाचवले. एका घटनेत, बुडताना एकाच वेळी दोन जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले. याशिवाय एका बालकाची कुत्र्यांच्या हल्ल्यातून सुटका केली, तर हरवलेल्या एका मुलाला पालकांपर्यंत सुखरूप पोहोचवण्याचे कार्य जीवरक्षकांनी केले.

हरमल येथील ‘स्वीट वॉटर लेक’ परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जीवरक्षकांनी दोघांचे प्राण वाचवले. पहिल्या घटनेत ४६ वर्षीय व्यक्ती खोल पाण्यात बुडत असताना जीवरक्षकांनी त्याला बाहेर काढले. तर दुसऱ्या घटनेत महाराष्ट्रातील ३६ वर्षीय पर्यटकाला सुरक्षितरीत्या किनाऱ्यावर आणले. आश्वे किनाऱ्यावर रशियाची १३ वर्षीय मुलगी समुद्राच्या भोवऱ्यात अडकली होती, तिला रेस्क्यू बोटीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले.
रेस्टॉरंटमध्ये सीपीआरद्वारे जीव वाचवण्याचा प्रयत्न
कोलवा समुद्रकिनाऱ्यावर खेळणाऱ्या ७ वर्षांच्या बालकावर मोकाट कुत्र्याने हल्ला करून त्याला जखमी केले. जीवरक्षकांनी तत्काळ धाव घेऊन बालकावर प्राथमिक उपचार केले आणि पालकांना पुढील वैद्यकीय सल्ल्यासाठी पाठवले. तर बागा येथे एक ४ वर्षांचा मुलगा आपल्या पालकांपासून दुरावला होता. बीच मार्शल आणि जीवरक्षकांनी त्याचा ताबा घेऊन शोधमोहीम राबवली. गोवा पोलिसांच्या उपस्थितीत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुलाला पालकांच्या स्वाधीन केले.
एका रेस्टॉरंटमध्ये एक ग्राहक अचानक बेशुद्ध पडल्याची माहिती मिळताच, जीवरक्षकांनी तिथे धाव घेतली. १०८ रुग्णवाहिका येईपर्यंत सुमारे ४५ मिनिटे त्या व्यक्तीला ‘सीपीआर’ आणि ऑक्सिजन देऊन शुद्धीवर आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.
कायाकिंग करताना अपघात; वृद्धेला मदत
पाळोळे किनाऱ्यावर गोव्यातील दोन तरुणांचा ४०० मीटर अंतरावर ‘कायाकिंग’ करताना तोल जाऊन ते समुद्रात पडले. गस्तीवर असलेल्या जीवरक्षकांनी तत्काळ जेटस्कीच्या सहाय्याने तिथे पोहोचून दोघांचेही प्राण वाचवले. तसेच कळंगुट किनाऱ्यावर जमिनीवर पडलेल्या एका ८७ वर्षीय वृद्ध महिलेला जीवरक्षकांनी वैद्यकीय मदत पुरवून रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी पाठवले.