खोतोडा येथे बेकायदेशीर चिरेखाणीवर वाळपई पोलिसांकडून छापा

मशिनरी, मालवाहू ट्रक जप्त : जमीनमालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd March, 11:36 pm
खोतोडा येथे बेकायदेशीर चिरेखाणीवर वाळपई पोलिसांकडून छापा

खोतोडा-माळशेकरवाडा येथे सुरू असलेली बेकायदेशीर चिरेखाण.

वाळपई : खोतोडा पंचायत क्षेत्रातील माळशेकरवाडा येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर चिरेखाणीवर वाळपई पोलिसांनी सोमवारी छापा टाकून मोठ्या प्रमाणात मशिनरी व साहित्य जप्त केले. या प्रकरणी जमिनीचे मालक सडयो यशवंत माळशेकर (रा. माळशेकरवाडा, खोतोडा) यांच्यावर भारतीय न्याय दंड संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, खोतोडा ग्रामपंचायत क्षेत्रातील माळशेकरवाडा येथे काही महिन्यांपासून बेकायदेशीर चिरेखण सुरू असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर पोलिसांनी खातरजमा करून सोमवारी संबंधित ठिकाणी धाड घातली.
धाडीच्या वेळी त्या ठिकाणी चिरेखननाचे काम सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी चिरे काढण्याचे मशीन, जनरेटर तसेच चिरे वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा मालवाहू ट्रक जप्त केला. घटनास्थळी आढळून आलेली इतर साधनसामग्रीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
प्राथमिक चौकशीनंतर सडयो माळशेकर यांच्यावर बेकायदेशीर चिरेखनन, जमिनीचे अनधिकृत उत्खनन, पर्यावरणाची हानी करणे तसेच जैवविविधतेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय न्याय दंड संहितेअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर कारवाई स्थानिक नागरिकांनी दिलेल्या तक्रारीवरून करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून या भागात मोठ्या प्रमाणावर चिरेखाणीचा व्यवहार सुरू होता. या ठिकाणाहून होणारी चिरे वाहतूक ही परिसरातील नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत होती. धूळप्रदूषण, रस्त्यांची हानी आणि वाहतुकीचा त्रास यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला होता.
सत्तरीत राजरोस बेकायदा चिरेखाणी सुरूच
सत्तरी तालुक्यात इतर ठिकाणीही अशाच प्रकारे बेकायदेशीर चिरेखाणी बिनधास्तपणे सुरू असल्याची चर्चा आहे. अशा अनधिकृत व्यवसायांवर येत्या काळात अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, असे संकेत पोलीस सूत्रांनी दिले आहेत. दरम्यान, जप्त केलेली मशिनरी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, वाळपई पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा