हरमल येथे २०२१ मध्ये इटालियन महिलेवर झाला होता लैंगिक अत्याचार

पणजी : पीडित विदेशी महिलेची न्यायालयात उलटतपासणी झाली नाही. तसेच खटला पूर्णपणे परिस्थितीजन्य पुराव्यांवर अवलंबून होता, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने हरमल येथे २०२१ मध्ये इटालियन महिलेवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातून केरळ येथील सिमिल मणी या युवकाची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. याबाबतचा आदेश पणजी येथील विशेष जलदगती न्यायालयाच्या न्यायाधीश पूजा कवळेकर यांनी दिला.
पीडित इटालियन महिलेने पेडणे पोलीस स्थानकात १४ जून २०२१ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, संशयित सिमिल मणी आणि इटालियन महिलेत मैत्रीचे संबंध होते. त्यामुळे ती संशयित राहत असलेल्या हरमल येथील भाड्याच्या खोलीवर जात होती. याच दरम्यान फेब्रुवारी २०२० ते एप्रिल २०२१ या कालावधीत संशयित युवकाने अनेकदा तिला मारहाण केली. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याशिवाय संशयिताने तिची ३.१८ लाख रुपयांची फसवणूक केली. याची वाच्यता केल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले होते. याची दखल घेऊन पेडणे पोलिसांनी संशयित केरळीयन युवकाविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर संशयिताने पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयाने त्याला १ लाख रुपये व इतर अटींवर अटकपूर्व जामीन मंजूर केला. पेडणे पोलिसांनी ३ डिसेंबर २०२१ रोजी संशयिताला अटक करून न्यायालयाच्या आदेशानुसार, सुटका केली.
पेडणे पोलिसांनी तपास पूर्ण करून २२ डिसेंबर २०२१ रोजी न्यायालयात संशयित सिमिल मणी याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयाने प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन ४ नोव्हेंबर २०२३ रोजी आरोप निश्चित करून खटला सुरू केला. दरम्यान, या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, पीडित महिला आपल्या मूळ देशात गेल्यामुळे तिला न्यायालयात उपस्थित करण्यास पोलिसांना अपयश आले. तर, न्यायालयाने चार साक्षीदारांची उलटतपासणी केली.
न्यायालयाने याची दखल घेऊन वरील निरीक्षण नोंदवून संशयित सिमील मणी या केरळीयन युवकाची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.
चार साक्षीदारांची उलटतपासणी
पीडित महिला आपल्या मूळ देशात गेल्यामुळे तिला न्यायालयात उपस्थित करण्यास पोलिसांना अपयश आले. त्यामुळे तिची न्यायालयात उलटतपासणी झाली नाही. दरम्यान, न्यायालयाने चार साक्षीदारांची उलटतपासणी केली.