गोव्यात एका वर्षात वापरला गेला १.१४ लाख जीबी इंटरनेट डेटा

‘ट्राय’चा अहवाल : सार्वजनिक वाय फाय हॉटस्पॉटद्वारे वापरलेल्या डेटाचा समावेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
59 mins ago
गोव्यात एका वर्षात वापरला गेला १.१४ लाख जीबी इंटरनेट डेटा

पणजी : राज्यात जानेवारी ते डिसेंबर २०२५ या बारा महिन्यांच्या कालावधीत तब्बल १ लाख १४ हजार जीबी इंटरनेट डेटा (internet data) वापरला गेला आहे. यामध्ये केवळ सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या वाय फाय हॉटस्पॉटद्वारे (Wi Fi hotspot) वापरल्या गेलेल्या डेटाचा समावेश करण्यात आला आहे. असे असले तरी वरील काळात असे हॉटस्पॉट वापरणाऱ्यांची संख्येत (युजर) घट झाली आहे. भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरणाच्या (ट्राय) विविध अहवालांतून ही माहिती मिळाली आहे.

अहवालानुसार जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान गोव्यात १४७ सार्वजनिक वाय फाय हॉटस्पॉट, तर ५२७ अक्सेस पॉईंट होते. याचा १३ हजार ५९६ युजरनी वापर करून २९ हजार जीबी इंटरनेट डेटा वापरला होता. एप्रिल ते जून दरम्यान २९ हजार जीबी, जुलै ते सप्टेंबर दरम्यान २५ हजार जीबी इंटरनेट डेटा वापरला. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ युजरची संख्या कमी होऊन ८०५२ इतकी झाली. तरी देखील इंटरनेट डेटा वापर वाढून ३१ हजार जीबी झाल्याचे अहवालात नमूद केले आहे.

एका वर्षात संपूर्ण देशात ५५ हजार ४८३ वायफाय हॉटस्पॉट होते. याचा २ कोटींहून अधिक युजरनी वापर करून तब्बल ५.०१ कोटी जीबी इंटरनेट डेटा वापरला होता. डिसेंबर २०२५ अखेरीस देशात सर्वाधिक १० हजार वायफाय हॉटस्पॉट गुजरातमध्ये होते. यानंतर महाराष्ट्र (५,२८५), तेलंगणा (४,०७८), मकेरळ (३,६६४), मध्यप्रदेश (३,४५१) यांचा क्रमांक लागतो. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील युजरनी सर्वाधिक १४ लाख जीबी डेटा वापरला, तर सिक्कीममध्ये सर्वांत कमी १ हजार जीबी डेटा वापरला गेला.

गोव्यातील इंटरनेट घनता सर्वाधिक
इंटरनेट घनतेत गोवा देशात प्रथम स्थानी आहे. यामध्ये दर शंभर व्यक्तींमागे इंटरनेट वापरकर्त्यांची टक्केवारी देण्यात आली आहे. यानुसार गोव्यातील ही टक्केवारी १५१.४२ इतकी होती, तर केरळमध्ये १०४.८४ टक्के, हरियाणामध्ये १०२ टक्के होती. बिहारमधील इंटरनेट घनता सर्वांत कमी म्हणजे ४४.५३ टक्के होती.