गोव्यात होळी साजरी करण्यासाठी पर्यटकांची झुंबड

समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले : सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे देशी पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
गोव्यात होळी साजरी करण्यासाठी पर्यटकांची झुंबड

पणजी : यंदा गोव्यात होळी (Holi celebration) साजरी करण्याला पर्यटकांनी (tourists) पसंती दिली आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे राज्यातील देशी पर्यटकांच्या (Domestic Tourist) संख्येत मोठी वाढ झाली असून समुद्रकिनारे (Goan beaches) पर्यटकांनी फुलून गेले आहेत. पर्यटकांच्या या आगमनामुळे पर्यटन व्यावसायिकांना 'अच्छे दिन' आले आहेत.

देशात होळीचा मोठा उत्सव उत्तर भारतात साजरा केला जातो. मात्र, उत्तर भारतातील लोकांनी आपल्या राज्याऐवजी गोव्यात येऊन होळी साजरी करण्याला अधिक पसंती दिली आहे. शनिवार, रविवार आणि मध्ये सोमवार सोडल्यास मंगळवारी होळीची सुट्टी असल्याने, सलग चार दिवसांची सुट्टी घेऊन पर्यटकांनी गोव्यात गर्दी केली आहे. किनारी भागांत पर्यटकांची मोठी गर्दी असून संध्याकाळच्या वेळी रस्त्यांवर वाहनांची आणि पर्यटकांची प्रचंड कोंडी पाहायला मिळत आहे.

किनाऱ्यांवर खास पार्ट्यांचे आयोजन
होळीनिमित्त कळंगुट, वागातोर, मोरजी, दोनापावला येथे मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खासगी नाईट क्लबमध्येही विशेष पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले असून, यात सहभागी होण्यासाठी देशभरातून पर्यटक एकत्र आले आहेत. उत्तर गोव्यातील कांदोळी, कळंगुट, वागातोर या भागांत पर्यटकांची संख्या मर्यादेबाहेर आहे, तर इतर भागांत संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

आठवड्याच्या शेवटी दीर्घ सुट्टी आल्याने देशी पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. यामुळे हॉटेलमधील ८५ ते ९५ टक्के खोल्या बुक आहेत. मार्चनंतर लग्नाचा हंगाम सुरू होईल, तेव्हा 'डेस्टिनेशन वेडिंग'मुळे हॉटेल व्यवसायात अधिक वाढ होईल.
- नीलेश शाह, टीटीएजीचे सदस्य

होळीनिमित्त पर्यटकांचा ओघ वाढला आहे. गेल्या एक-दोन दिवसांत व्यवसायात चांगला नफा झाला असून सर्व शॅक ग्राहकांनी भरलेले आहेत.
- मॅन्युएल कार्दोज, अ.गो. पारंपरिक शॅक मालक संघटनेचे अध्यक्ष
युद्धाचा पर्यटनावर परिणाम शक्य
सध्या सुरू असलेल्या जागतिक युद्धाच्या (war) परिस्थितीचा फटका विदेशी पर्यटनाला (Goa tourism) बसू शकतो, असे नीलेश शाह यांनी नमूद केले. युद्धामुळे लोक बाहेर पडायला बघत नाहीत, त्यामुळे पुढील ८-१० दिवस परिस्थितीचा आढावा घ्यावा लागेल.