भुयारी मार्ग शक्य नसल्यास पादचारी पूल उभाणार; पण समस्या सोडवणार!

मंत्री दिगंबर कामत यांच्याकडून उपासनगर येथे कामांची पाहणी.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
31 mins ago
भुयारी मार्ग शक्य नसल्यास पादचारी पूल उभाणार; पण समस्या सोडवणार!

कुठ्ठाळी: उपासनगर परिसरातील नागरिकांच्या गेल्या अनेक दिवसांच्या मागणीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी बुधवारी या भागाची सविस्तर पाहणी केली. कुठ्ठाळीचे आमदार अंतोन वास आणि स्थानिक रहिवाशांच्या उपस्थितीत झालेल्या या संयुक्त पाहणीदरम्यान, परिसरात भुयारी मार्ग (अंडरपास) किंवा पादचारी पुलाची निर्मिती करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

स्थानिक नागरिकांनी या भागात भुयारी मार्गाची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री कामत यांनी आश्वासन दिले की, फ्लायओव्हरच्या खालून मोटार चालवता येईल अशा भुयारी मार्गाच्या व्यवहार्यतेची तांत्रिक तपासणी केली जाईल. जर तांत्रिक कारणास्तव भुयारी मार्ग शक्य नसेल, तर दुसरा पर्याय म्हणून या ठिकाणी एस्केलेटरसह पादचारी पूल उभारण्याचा विचार केला जाईल. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी एस्केलेटरची सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरेल, असे मत मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले.

आमदार अंतोन वास यांनी या पाहणीवर समाधान व्यक्त केले असून, या संयुक्त पाहणीमुळे समस्येचा मोठा भाग सुटला असल्याचे सांगितले. योग्य तांत्रिक तोडगा काढून लवकरच कामाला सुरुवात होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अच्युत नाईक यांनी सात सदस्यीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही समिती लवकरच सार्वजनिक बांधकाम मंत्री, स्थानिक आमदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अधिकाऱ्यांची भेट घेऊन संभाव्य उपायांवर सविस्तर चर्चा करणार आहे.

हेही वाचा