डिजिटल टॅक्सी धोरणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांची ३५ टॅक्सी संघटनांसोबत बैठक

चर्चा सुरू. बैठकीत वाहतूक खात्याचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
डिजिटल टॅक्सी धोरणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांची ३५ टॅक्सी संघटनांसोबत बैठक

पणजी: गोव्यातील टॅक्सी व्यवसायाला शिस्त लावण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य सरकारकडून प्रस्तावित असलेल्या 'डिजिटल टॅक्सी धोरणा'बाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची गुरुवारी पर्वरी येथील मंत्रालयात राज्यातील ३५ टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत डिजिटल मीटर, ॲप-आधारित सेवा आणि टॅक्सी दरांचे सुसूत्रीकरण यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली जाईल.



राज्यात टॅक्सी चालकांकडून पर्यटकांची होणारी कथित लूट आणि दुसरीकडे टॅक्सी चालकांना भेडसावणाऱ्या समस्या यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरकार हे नवे धोरण आणण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, हे धोरण केवळ पर्यटकांच्या हितासाठी नसून टॅक्सी चालकांच्या व्यवसायात पारदर्शकता आणण्यासाठी आणि त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आहे. डिजिटल प्रणालीमुळे पर्यटकांचा विश्वास वाढेल, ज्यामुळे अंतिमतः स्थानिक टॅक्सी व्यवसायालाच फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीत त्यांच्या विविध शंका आणि मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडतील. यामध्ये प्रामुख्याने खाजगी ॲग्रिगेटर कंपन्यांचे आव्हान आणि डिजिटल मीटरमधील तांत्रिक अडचणींचा समावेश असेल. या बैठकीला वाहतूक खात्याचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित आहेत.


बातमी अपडेट होत आहे. 


हेही वाचा