मध्यपूर्व आशिया युद्धाच्या गर्तेत! कुवेतजवळ तेलवाहू जहाजावर हल्ला

समुद्रात तेलगळती; उद्भवले पर्यावरणीय संकट!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
35 mins ago
मध्यपूर्व आशिया युद्धाच्या गर्तेत! कुवेतजवळ तेलवाहू जहाजावर हल्ला

कुवेत सिटी: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता आखाती देशांमधील सागरी मार्गांवर पसरला असून, गुरुवारी कुवेतच्या किनारपट्टीजवळ एका तेलवाहू टँकरचा भीषण स्फोट झाला. ब्रिटनच्या सागरी सुरक्षा एजन्सीने (UKMTO) दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटामुळे टँकरच्या कार्गो टँकचे मोठे नुकसान झाले असून समुद्रात मोठ्या प्रमाणावर तेलगळती सुरू झाली आहे. या घटनेमुळे सागरी पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. टँकरच्या कॅप्टनने दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाला तेव्हा घटनास्थळावरून एक लहान नौका वेगाने लांब जाताना दिसली.



कुवेतच्या गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, हा स्फोट कुवेतच्या प्रादेशिक जलसीमेबाहेर, मुबारक अल-कबीर बंदरापासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर झाला आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून चालक दल सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स'ने ऊर्जा वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या हॉर्मुझ सामुद्रधुनीवर आपले पूर्ण नियंत्रण असल्याचे जाहीर केले आहे.


Representative Image. (AI generated)


या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, चीनच्या 'कॉस्को' (COSCO) या मोठ्या शिपिंग कंपनीने कुवेतसह आखाती देशांमधील आपली मालवाहतूक तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ अमेरिकन पाणबुडीने इराणच्या 'आयआरआयएस देना' या युद्धनौकेवर केलेल्या टॉरपीडो हल्ल्यात ८० हून अधिक खलाशांचा मृत्यू झाला होता. सध्या या क्षेत्रातील परिस्थिती स्फोटक बनली आहे.

हेही वाचा