युद्धाचा भडका; भारतातील फळे, भाज्या,बासमती तांदळाचे कंटेनर अडकले

प्रचंड नुकसान; खाद्यतेलासह सुका मेवा, खजूर, डाळी महागल्या

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
06th March, 05:52 pm
युद्धाचा भडका; भारतातील फळे, भाज्या,बासमती तांदळाचे कंटेनर अडकले

नवी दिल्ली : अमेरिका (America), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) यांच्यातील संघर्षाचा फटका आता जागतिक बाजारपेठेला बसू लागला आहे. आखाती देशात युद्धाचा भडका उडाल्याने भारतातून (India) फळे, भाज्या, बासमती तांदूळ (Basmati Rice) तसेच इतर साहित्य घेऊन जाणारे कंटेनर (Container) अडकून पडले आहेत. त्यामुळे प्रचंड आर्थ‌िक हानी होऊ लागली आहे. खाद्य तेलासह सुका मेवा खजूर, डाळी इत्यादी महाग झाल्या आहेत. 

४ लाख टन बासमती तांदूळ अडकला

भारतातून निर्यात होणारा ४ लाख टन बासमती तांदूळ अडकला आहे. त्याचा फटका निर्यातदार, शेतकरी यांच्यासहीत सर्वांना बसला आहे. शेकडो कोटी तांदळाची वाहतूक बंदरांवर अडकून पडली आहे. भारत एकूण बासमती तांदळाच्या निर्यातीपैकी सुमारे ७२ टक्के निर्यात आखती देशांमध्ये करतो. जर युद्ध सुरूच राहिले तर निर्यातीवर गंभीर परिणाम होणार आहेत.

पंजाब बासमती तांदूळ निर्यातदार संघटनेचे संचालक अशोक सेठी यांनी सांगितले की, आखाती देशांमध्ये बासमती तांदळाची सर्वात जास्त निर्यात बिर्याणीमुळे होते. बासमती तांदळाची ही सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे. युद्धामुळे बासमती व्यवसायाला धक्का बसला आहे. आकडेवारीनुसार, सुमारे २ लाख टन तांदूळ वाहतुकीत आहे आणि २ लाख टन तांदूळ बंदरांवर अडकला आहे. 

फळे, भाज्यांचे १ हजार कंटेनर अडकले

आखाती देशातील संघर्षामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणि निर्यातदारांना मोठे आर्थ‌िक नुकसान सहन करावे लागत आहे. कृषी उत्पादने घेऊन जाणारे सुमारे १००० कंटेनर दुबईच्या जेबेल अली बंदरात अडकले आहेत. २८ फेब्रुवारीपासून वाहतूक बंद असल्याने; कंटेनरने विविध देशांमध्ये निर्यात करता येत नाहीत.

त्यामुळे लाखो रुपयांचा माल वाया जात आहे. महाराष्ट्रातील १ हजार कंटेनर दुबई बंदरात अडकले आहेत. त्यात केळी, डांळिब, द्राक्षे, टरबूज, कांदे व हंगामी भाज्यांचा समावेश आहे. हे कंटेनर वेळेत न पोहोचल्यास खराब होतात व निर्यातदारांसहीत सर्वांचे मोठे नुकसान होते. 

खाद्यतेल, सुका मेवा, खजूर, डाळी महागल्या

देशभरातील बाजारात खाद्यतेल, डाळी, सुका मेवा, खजूर, बदाम, पिस्ता, अंजीर महाग होऊ लागले आहेत. भारत इराणमधून खाद्यतेल आणत नाही. मात्र, भारत आपल्या गरजेचे ६० टक्के खाद्यतेल अन्य देशांतून आणतो. मलेशिया, इंडोनेशियातून पामतेल, ब्राझील आणि अर्जेंटिनातून तेल, सोयाबीन, रशियातून सूर्यफुलाचे तेल आणतो.

युद्धामुळे क्रूड ऑईल महागली आहे. बायोफ्युएल तयार करण्यासाठी पाम व सोया तेलाचा वापर जास्त केला जात आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या पुरवठ्यात घट झाली आहे व किमती वाढत आहेत.

इमामी एग्रोटेकचे सीईओ आणि इंडियन व्हेजिटेबल ऑइल प्रोड्युसर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर देसाई यांनी सांगितले की, इराण आणि अमेरिका यांच्यामधील तणावामुळे भारतातील क्रूड ऑइलच्या किंमती वाढल्याने, पेट्रोल डिझेल आणि फॉसिल फ्यूल महाग होते. त्यामुळे लॉजिस्टिकचा खर्च वाढतो आणि त्यामुळे जहांजासाठी जोखीम देखील वाढू शकते. 


हेही वाचा