
नवी दिल्ली : आसामात (Assam) हवाई दलाचे (Indian Air Force) सुखोई जेट (Sukhoi Jet) लढाऊ विमान कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत २ वैमानिकांचा मृत्यू झाला.
गुरुवारी संध्याकाळी जोरहाट येथून उड्डाण केल्यानंतर सुखोई एसयू ३० एमकेआय लढाऊ विमान काही वेळातच बेपत्ता झाले. गुरुवारी संध्याकाळी रडारशी संपर्क तुटला. आसामच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळी जोरहाट येथून उड्डाण केल्यानंतर रडारशी संपर्क तुटल्याने सुखोई एसयू ३० एमकेआय लढाऊ विमानाचा अपघात झाल्याची माहिती भारतीय हवाई दलातर्फे देण्यात आली. दोन वैमानिकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. स्क्वाड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरागकर अशी या वैमानिकांची नावे आहेत.
जोरहाट एअरबेसपासून सुमारे ६० किमी अंतरावर असलेल्या कार्बी आंगलोंगच्या डोंगराळ भागात सुखोई लढाऊ विमान कोसळले. प्रशिक्षण मोहीमेवर हे विमान होते. संध्याकाळी ७.४२ वाजता विमानाचा जमिनीवरील नियंत्रणाशी शेवटचा संपर्क झाला होता. त्यानंतर या विमानाशी संपर्क होऊ शकला नाही.
सुखोई एसयू ३० एमकेआय हे २००० च्या दशकाच्या सुरुवातीला हवाई दलात समाविष्ट केलेले सर्वात सक्षम आघाडीच्या लढाऊ विमानांपैकी एक मानले जाते. सुखोई ३० फायटर जेट यापूर्वीही कोसळले आहे. सध्या २०० हून अधिक सुखोई जेट्सचा ताफा हवाई दलाकडे आहे.