चोर्ला घाटमार्गे बेळगावहून गोव्यात बेकायदेशीर वाहतूक; चालक ताब्यात

वाळपई : गोवा–बेळगाव दरम्यानच्या चोर्ला घाट परिसरातून बेळगावमार्गे गोव्यात गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक अजूनही सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शुक्रवारी सकाळी बेळगावहून गोव्याकडे येणाऱ्या भाजीपाला वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनातून (के.ए.-२२-बी-३५४२) गोमांस आणले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला.
होंडा येथील नागरिकांनी संशयित पिकअप थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे साडेसातशे किलो गोमांस असल्याचे आढळले. याबाबत वाळपई पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पिकअपसह चालक सादिक बी. नाईकवाडी (रा. बेळगाव, कर्नाटक) याला ताब्यात घेतले.
बेळगाव भागातून गोव्यात मोठ्या प्रमाणात गोमांसाची वाहतूक होत असल्याचे यापूर्वीही समोर आले आहे. विविध मार्ग आणि पद्धतींचा वापर करून हा माल गुप्तपणे आणला जात असल्याचे दिसून येते. गेल्या वर्षभरात अशा प्रकारच्या सुमारे सात घटना समोर आल्या आहेत. यापूर्वी गोप्रेमींनी या प्रकरणी पोलिसांनी अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही केली होती. तरीही हे प्रकार सुरूच असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
शुक्रवारी सकाळी घडलेल्या घटनेत होंडा परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले की, संबंधित पिकअपमधून रस्त्यावर रक्त सांडत होते. त्यामुळे संशय निर्माण झाला. नागरिकांनी वाहनाचा पाठलाग करून चालकाकडे चौकशी केली; मात्र चालकाने समाधानकारक उत्तर देण्याचे टाळल्याने संशय अधिकच बळावला. स्थानिकांनी वाहनाची तपासणी करण्याचा प्रयत्न केला असता चालकाने अरेरावीची भाषा वापरल्याचेही सांगितले जाते.
यानंतर वाळपई पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पिकअपची तपासणी केली असता वाहनाच्या पुढील भागात पिशव्यांमध्ये भरलेले सुमारे ७५० किलो गोमांस आढळले. त्यावर भाजी व फळांच्या पिशव्या ठेवून माल लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. भाजी वाहतुकीच्या नावाखाली गोमांसाची वाहतूक होत असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
होंडा भागातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पिकअप वाहन बेळगावहून गोव्यात नियमितपणे भाजी व फळांची वाहतूक करीत असते. त्यामुळे या वाहनातून वारंवार बेकायदेशीरपणे गोमांस आणले जात असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांनी पिकअप जप्त करून चालक सादिक नाईकवाडी याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
जप्त करण्यात आलेल्या साडेसातशे किलो गोमांसाची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
नाक्यावर कडक तपासणीची मागणी
बेळगाव भागातून भाजी व फळांच्या वाहनांमधून अशाप्रकारे गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केरी परिसरात पोलिसांचा नाका असूनही अशाप्रकारे वाहनांमधून गोमांसाची वाहतूक कशी होते, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.