
पणजी : स्वतःला कॅनरा बँकेचा ग्राहक सेवा प्रतिनिधी असल्याचे भासवून संशयिताने तिसवाडी तालुक्यातील ७० वर्षीय ज्येष्ठ महिलेला ३०.९८ लाख रुपयाचा गंडा घातला. या प्रकरणी सायबर विभागाने अज्ञात व्हॉट्सअॅप मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी करमळी परिसरातील ७० वर्षीय ज्येष्ठ महिलेने तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार महिलेचे जीपे आणि डेबिट कार्ड बंद पडले होते. त्यामुळे तिने कॅनरा बँकेशी ऑनलाईन पद्धतीने संपर्क साधला. याच दरम्यान तिला ९४१४३५२५७१ या क्रमांकावरून संपर्क करण्यात आला. संशयिताने तिला कॅनरा बँकेचा ग्राहक सेवा प्रतिनिधी असल्याचे सांगितले. संशयिताने तिला फसवून ‘पोर्ट’ आणि तिचा मोबाईल क्रमांक टाकून संदेश पाठवायला भाग पाडले. त्याचवेळी तिचा मोबाईल क्रमांक हॅक झाला. त्यानंतर तिच्या मोबाईल क्रमांकाशी जोडलेल्या बँकिंग क्रेडेन्शियलचा गैरवापर करून संशयिताने तिच्या बँक खात्यांमध्ये अनधिकृत प्रवेश मिळवला. ही घटना १३ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडली. संशयिताने तिच्या खात्यांतून एकूण ३० लाख ९८ हजार ३४२ रुपये विविध लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले. याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक अनुष्का पैबीर यांनी अज्ञात मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.