पोलिसांच्या उपस्थितीत स्थानिकांकडून हल्ला

पेडणे : समाज कार्यकर्ते अॅड. सदानंद वायंगणकर हे धारगळ येथील तीन बेकायदेशीर बांधकामा संदर्भात पंचनामा करायला गेले असता, पोलीस व सरकारी यंत्रणेच्या उपस्थितीत स्थानिकांनी त्यांना जबर मारहाण केली.
धारगळ येथील ओशेलबाग परिसरात सर्व्हे क्रमांक ५४७/० या जागेवर तीन बेकायदेशीर बांधकामे उभारण्यात आली असल्याची तक्रार नीलेश धर्मा पटेकर यांनी विविध सरकारी खात्यांकडे केली होती. या बांधकामांमध्ये ‘काजूगर डिलाईट’, ‘ड्रीम रेस्टॉरंट’ तसेच मार्बल विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या प्रकरणात सध्या मुख्य विद्युत अभियंता म्हणून कार्यरत असलेले स्टीफन फर्नांडिस यांचाही सहभाग असल्याचा आरोप पटेकर यांनी केला आहे.
तक्रारीनुसार, गटविकास कार्यालयामार्फत धारगळ पंचायतीमार्फत सहा रोजी पंचनामा करण्यासाठी धारगळचे सरपंच अर्जुन कानोळकर, पंचायत सचिव प्रीतम सावंत, गटविकास कार्यालयाचे अभियंता आणि अॅड. सदानंद वायंगणकर उपस्थित होते.
यावेळी महिला आणि सज्जन कोनाडकर यांनी आपणास जबर मारहाण केल्याचे स्थानिक पत्रकारांशी बोलताना अॅड. सदानंद वायंगणकर यांनी सांगितले. तक्रारदार नीलेश पटेकर किंवा ज्यांच्यावर तक्रार दाखल केली होती ते स्टीफन फर्नांडिसही उपस्थित नव्हते. परंतु नीलेश पटेकर यांनी अॅड. सदानंद वायंगणकर यांना ऑथॉरिटी दिली होती. त्यामुळे अॅड. सदानंद वायंगणकर हे नीलेश पटेकर यांच्यामार्फत या पंचनाम्याला उपस्थित होते. उपस्थित महिला आणि नागरिकांनी अॅड. सदानंद वायंगणकर यांना लाथाबुक्क्यांनी व दंडुक्यानी जबर मारहाण केली. घटनास्थळी पोलीस, सरकारी यंत्रणा असतानाही त्यांना मारहाण करण्यात आली. पोलिसांनी जखमी अॅड. वायंगणकर यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. परंतु अॅड. सदानंद वायंगणकर यांनी हॉस्पिटलमध्ये जाण्यास हरकत घेतली होती. या घटनेचा आणि बेकायदेशीर बांधकामांचा पंचनामा होत नाही तोपर्यंत आपण जाणार नाही, असा हट्ट त्यांनी धरला होता. लगेच घटनास्थळी पंचायत सचिव, सरपंच, बीडीओ कार्यालयातील अभियंता उपस्थित झाले. त्यावेळी सदानंद वायंगणकर यांनी जखमी अवस्थेतही पंचनामा करा, असे सांगितले. त्यानंतर ते पोलिसांच्या वाहनांमधून उपचारासाठी गेले.
पेडणे पोलीस निरीक्षक हळदणकर यांनी लेखी तक्रार आल्यानंतर गुन्हा नोंदवून संबंधितांना अटक केली जाईल, असे सांगितले.
अॅड. सदानंद वायंगणकर यांना मारहाण करण्यासाठी अनेक नागरिक, महिला उपस्थित होत्या. परंतु ते कोण होते? हे आपल्याला माहीत नाही. पोलीस कॉन्स्टेबल भांडण सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करत होते. घडलेली घटना दुर्दैवी आहे, असे सरपंच अर्जुन कानोलकर यांनी सांगितले.