युदियो कंपनीच्या एमडीसह ६ जणांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगप्र​करणी आरोपपत्र दाखल

जादा व्याजाचे आमिष दाखवून ३ कोटींहून जास्त रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
युदियो कंपनीच्या एमडीसह ६ जणांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगप्र​करणी आरोपपत्र दाखल

पणजी : राज्यातील गुंतवणूकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून सुमारे ३ कोटींहून जास्त रुपयांचा गंडा घालण्यात आला. मनी लॉन्ड्रिंगचा दावा करून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) युदियो प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कृष्ण कुमार उर्फ विजय कुमार जैस्वाल, त्याची पत्नी रश्मी जैस्वाल यांच्यासह इतर चार जणांविरोधात मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात ३००० पानी आरोपपत्र दाखल केले.

गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) याप्रकरणी २०२२ मध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, ईओसीकडे पीडित गुंतवणूकदारांनी ईमेलद्वारे तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेऊन ईओसीने ८ जून २०२२ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यात मे. युदिवो प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विजय कुमार जैस्वाल यांनी १८ फेब्रुवारी २०२२ रोजी फातोर्डा येथे कार्यालय उघडून गुंतवणूकदारांना तीन वेगवेगळ्या योजनांद्वारे जादा व्याजाचे आमिष दाखवले होते. कंपनीने त्यासाठी ९ एजंटची नियुक्ती केली होती. काही काळ गुंतवणूकदारांना वेळोवेळी ठरल्याप्रमाणे परतावा देण्यात आला. कंपनीने या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांची सुमारे ३ कोटी रुपयांची फसवणूक करून कार्यालय बंद करून पळ काढला. कंपनीने फसवणूक केल्याचे समजल्यानंतर गुंतवणूकदारांनी ईमेलद्वारे विभागात तक्रार दाखल केली होती. याची दखल घेऊन ईओसीने गुन्हा दाखल करून कारवाई केली.

याच दरम्यान ईडीने या प्रकरणात आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली. यात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचे समोर आल्यानंतर ईडीने कारवाई सुरू केली. ईडीने चौकशी करून न्यायालयात ३००० पानी आरोपपत्र दाखल केले आहे.

कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी विविध योजना

कंपनीने पहिली योजना ११ हजार गुंतवणूक केल्यानंतर सहा महिन्यानंतर २३,४०० रुपयांसह पुढील सात महिने २००० प्रती महिने देण्याचे आमिष दाखवले होते.

दुसरी योजना १,२१,००० रुपये गुंतवणूक केल्यानंतर दहा महिन्यानंतर २,३४,००० रुपयांसह दरमहिना ९ हजार रुपये देण्याचे आमिष दाखवले होते. तिसरी योजना २८,५०० रुपये गुंतवणूक केल्यानंतर दहा महिन्यानंतर दरमहिना २ हजार रुपये, त्यानंतर १२, १८ व्या महिन्यात २० हजार रुपये देण्याचे व इतर वेगवेगळ्या योजनांद्वारे आमिष दाखवले होते. 

हेही वाचा