गोव्यात काजू मंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव : दिव्या राणे

१० ते १२ एप्रिलदरम्यान पणजीत काजू फेस्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
गोव्यात काजू मंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव : दिव्या राणे

काजू फेस्तच्या चौथ्या आवृत्तीची माहिती देताना गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष दिव्या राणे. सोबत इतर.

पणजी :
राज्यात काजू उद्योगाला बळकटी देण्यासाठी आणि काजूच्या अनियंत्रित पुरवठ्यावर नियंत्रण आणण्यासाठी स्वतंत्र काजू मंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष दिव्या राणे यांनी दिली. काजू हा गोव्यातील इतिहास, वारसा आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले.१० ते १२ एप्रिल दरम्यान पणजी, कांपाल येथे आयोजित करण्यात येणाऱ्या काजू फेस्तच्या चौथ्या आवृत्तीची माहिती देताना त्या बोलत होत्या. या उत्सवाचे आयोजन गोवा वन विकास महामंडळाकडून करण्यात येणार आहे.
राज्यात काजू मंडळ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा झाल्याचे राणे यांनी सांगितले. केरळ आणि महाराष्ट्रसारख्या राज्यांप्रमाणे गोव्यातही काजू मंडळ स्थापन करण्याची गरज असून, हा विषय विधानसभेतही मांडण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंडळ स्थापन झाल्यास सध्या होत असलेला अनियंत्रित काजू पुरवठा नियंत्रित करता येईल.
काजू पिकाचे घटते उत्पादन तसेच बाजारात येणाऱ्या बनावट काजू बियांच्या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी दरवर्षी हा काजू महोत्सव आयोजित केला जात असल्याचे राणे यांनी सांगितले. काजू उद्योगातील भागधारकांना प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
तीन दिवसांचा सांस्कृतिक कार्यक्रम
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात स्थानिक कलाकारांचे सादरीकरण, विविध डीजे कार्यक्रम, फॅशन शो, गोव्यातील नामांकित बँडचे कार्यक्रम तसेच राष्ट्रीय कलाकारांची सादरीकरणे होणार आहेत. याशिवाय काजू उद्योगाशी संबंधित विविध विषयांवर सकाळच्या सत्रात तांत्रिक चर्चासत्रेही आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिव्या राणे यांनी दिली.

काजू हे केवळ फळ नसून प्रत्येक गोमंतकीयाशी त्याचे भावनिक नाते आहे. त्यामुळे काजू उद्योगाला चालना देणे आणि त्यापासून तयार होणाऱ्या दर्जेदार उत्पादनांना, जसे काजू बी आणि फेणी, प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.‍‍‍‍ - दिव्या राणे, अध्यक्ष, गोवा वन विकास महामंडळ   
  

हेही वाचा