पोलिसांकडून दहाजणांविरुद्ध गुन्हा नोंद

म्हापसा : बोडगिणी म्हापसा येथे होळीनिमित्त आयोजित ‘होळी पार्टी इव्हेंट’ या विशेष संगीत कार्यक्रमात दोन गटांतील वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यामध्ये एका युवतीसह चारजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी अज्ञात १० जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
मारहाणीत जखमी झालेल्यांमध्ये शौर्य मयेकर, निकिता कार्व्हालो, क्रिश नावेलकर, दिव्यम मयेकर (सर्व रा. म्हापसा) यांचा समावेश आहे. सर्वांवर जिल्हा इस्पितळात उपचार करून घरी पाठवण्यात आले.
ही घटना बुधवार, दि. ४ रोजी रात्री ८.३० वा. सुमारास घडली. याप्रकरणी शौर्य मयेकर यांनी तक्रार दिली आहे. बोडगिणी येथील खुल्या मैदानावर होळीनिमित्त संगीत रजनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळपासून सुरू असलेल्या या कार्यक्रमात दिवसभर गटागटात लहानसहान भांडणे सुरूच होती. तिथे तैनात पोलिसांकडून ही भांडणे मिटविण्यात आली.
मात्र, रात्री साळगाव व म्हापसा येथील दोन गटांत बाचाबाची झाली. या वादाचे रुपांतर पुढे हाणामारीत झाले. या संघर्षात म्हापसा येथील गटावर बियर बाटल्यांनी हल्ला करण्यात आला. त्यात फिर्यादी शौर्य मयेकर व इतर जखमी झाले. त्यांना तत्काळ म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रात्री तिघांना तर गुरुवारी सकाळी शौर्यला डिस्चार्ज देण्यात आला.
म्हापसा पोलिसांनी याप्रकरणी सुरुवातीला चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, या युवकांचा मारहाणीमध्ये समावेश नसल्याचे आढळून आल्यावर त्यांना सोडण्यात आले. फिर्यादी मयेकर याने १० जणांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शिवीगाळ घालणे, धमकी देणे, मारहाण करणे या आरोपाखाली संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
घटनास्थळी पार्क केलेल्या ‘थार’ची मोडतोड
सुरुवातीला म्हापसा पोलिसांनी या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यास टाळाटाळ केली होती. नंतर मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवला. दरम्यान, घटनास्थळी पार्क केलेली एक थार जीपची देखील संशयित गटाने मोडतोड केली.