म्हापशात होळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात हाणामारी; दोघे जखमी

म्हापसा पोलिसांकडून चार जण चौकशीसाठी ताब्यात

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
04th March, 11:48 pm
म्हापशात होळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात हाणामारी; दोघे जखमी

म्हापसा : बोडगिणी-म्हापसा येथे होळीनिमित्त आयोजित संगीत कार्यक्रमात दोन गटांतील वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. यात दोघे जखमी झाले असून त्यांना म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. ही घटना बुधवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

बोडगिणी येथील खुल्या जागेत होळीनिमित्त ‘संगीत रजनी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून सुरू असलेल्या या कार्यक्रमात सायंकाळी साळगाव व म्हापसा येथील युवकांच्या दोन गटांत बाचाबाची झाली. या वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. यात दोन युवक जखमी झाले आहेत. एकाच्या चेहऱ्यावर बाटली मारल्याने त्याच्या नाकाला गंभीर दुखापत झाली, तर दुसऱ्याच्या चेहऱ्याला इ​जा झाली आहे. जखमींपैकी एक युवक १९ वर्षांचा, तर दुसरा २१ वर्षांचा आहे. जखमींना तातडीने म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

दरम्यान, म्हापसा पोलिसांनी याप्रकरणी चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

हेही वाचा