महिलेला १४.६७ लाखांना लुबाडणाऱ्या भामट्याला हुबळी येथून अटक

सायबर विभागाची कारवाई : ‘ट्राय’चा अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th March, 10:56 pm
महिलेला १४.६७ लाखांना लुबाडणाऱ्या भामट्याला हुबळी येथून अटक

पणजी : तिसवाडी तालुक्यातील एका ज्येष्ठ महिलेला भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा (ट्राय) अधिकारी असल्याचे भासवून तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा वापर करून १४.६७ लाखांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सायबर विभागाने हुबळी येथून मोहन कळवे याला अटक केली.

सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तिसवाडी तालुक्यातील एका ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, तक्रारदार महिलेला भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा (ट्राय) अधिकारी असल्याचे भासवून ९९६५४२५९९७, ८७९६१४२५४५ आणि ९५७८३३६१२५ या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून कॉल केला. संशयितांनी महिलेचे आधार कार्ड वापरून मोबाईल सिम कार्ड घेतल्याचे सांगितले. तसेच त्या सिम कार्डवरून अनधिकृत जाहिराती आणि त्रास देणारे मजकूर पाठवण्यात आल्याचे सांगितले. या संदर्भात तक्रार आल्याची माहिती देण्यात आली. याशिवाय तक्रारदार महिलेला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून ३१ जानेवारी रोजी ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण मिटविण्यासाठी विविध बँक खात्यांत १४ लाख ६७ हजार रुपये जमा करण्यास भाग पाडले. या प्रकरणी सायबर विभागाने अज्ञात व्हॉट्सअॅप मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान, विभागाने अधिक चौकशी केली असता, कर्नाटकातील एका बँक खात्यात वरील रकमेतील २ लाख रुपये जमा झाल्याचे समोर आले. त्यानुसार, अधीक्षक राहुल गुप्ता, सहाय्यक अधीक्षक बी. व्ही. श्रीदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक नवीन नाईक, काॅन्स्टेबल अक्षय वेर्लेकर आणि सिद्धरमाया मठ या पथकाला कर्नाटकात रवाना करण्यात आले. त्यानुसार, पथकाने हुबळीत संशयित मोहन कळवे याला ताब्यात घेऊन गोव्यात आणले. त्यानंतर संशयिताला अटक केली.

दरम्यान, त्याची अधिक चौकशी केली असता, तेलंगणा येथील एका सायबर घोटाळ्यातील २.०५ लाख रुपये त्याच्या खात्यात जमा झाल्याचे समोर आले.

गुजरातमधून एकाला अटक

सायबर विभागाने आणखीन एका प्रकरणात गुजरात येथून मनोजभाई वसावा (४०) याला अटक करून गोव्यात आणले आहे. या प्रकरणी फोंडा येथील एका नागरिकाच्या मोबाईलवर एक संदेश आला होता. तो त्याने उघडल्यानंतर त्याच्या बँक खात्यातून ७.७२ लाख रुपये काढण्यात आले. या प्रकरणातील ४ लाख रुपये वरील संशयिताच्या बँक खात्यात जमा झाल्याचे समोर आल्यानंतर सायबर विभागाने संशयिताला अटक करून कारवाई केली. 

हेही वाचा