कुंकळ्ळी पालिकेच्या मीटर रुममध्ये आढळला मृतदेह

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th March, 11:57 pm
कुंकळ्ळी पालिकेच्या मीटर रुममध्ये आढळला मृतदेह

मडगाव : कुंकळ्ळी नगरपालिकेच्या नव्या इमारतीच्या मागील बाजूच्या इलेक्ट्रिसिटी मीटर रुममधून दुर्गंधी येत असल्याने त्याठिकाणी पाहणी केली असता मृतदेह आढळून आला. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण झाले आहे.

कुंकळ्ळी नगरपालिकेच्या नव्या इमारतीच्या मागील बाजूच्या इलेक्ट्रिकल मीटर रुममधून दुर्गंधी येत असल्याचे कर्मचार्‍यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याठिकाणी जात तपासणी केली असता तिथे मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पंचनामा केला. मृतदेह मोठ्या प्रमाणात कुजला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात सदर मृतदेह ३० ते ५० वर्षे वयोगटातील पुरुषाचा असल्याचे समोर आले. पोलिसांकडून अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करुन घेत बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासल्या जात आहेत. याशिवाय संबंधित व्यक्तीचा मृत्यू नेमका कसा झाला, हा घातपात आहे का? याचा तपास पोलीस करीत आहेत. शवचिकित्सा अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. कुंकळ्ळी पालिकेच्या नव्या इमारतीमध्ये नागरिकांची येजा असते. अशाठिकाणी मृतदेह आढळून आल्याने इमारतीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

हेही वाचा