शिरगाव येथील लईराई जत्रेसाठी पर्यायी रस्त्याचा प्रस्ताव

आमदार प्रेमेंद्र शेट यांची सूचना : रस्ता करण्यासाठी शेतकऱ्यांची सहमती आवश्यक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
शिरगाव येथील लईराई जत्रेसाठी पर्यायी रस्त्याचा प्रस्ताव

लईराई जत्रोत्सवाचा आढावा घेताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत आमदार प्रेमेंन्द्र शेट व इतर.

डिचोली : शिरगाव येथील प्रसिद्ध श्री लईराई देवी मंदिर येथे होणाऱ्या जत्रेदरम्यान गर्दी कमी करण्यासाठी पर्यायी रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. शेतकऱ्यांनी ना हरकत दाखला दिल्यास शिरगाव येथील मानसवाडा ते मुड्डेर येथील बांध डांबरीकरण करून तो केवळ देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी पर्यायी मार्ग म्हणून वापरता येईल, असा सल्ला मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या शिरगाव भेटीदरम्यान दिला.
गतवर्षी शिरगाव लईराई जत्रा दरम्यान झालेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. गुरुवारी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी शिरगाव येथे भेट देऊन सदर कामाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी आमदार प्रेमेन्द्र शेट यांनी पर्यायी रस्त्याचा प्रस्ताव मांडला.
मुख्यमंत्र्यांनी या सूचनेची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिल्यानंतर आमदार शेट यांनी उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव, डिचोलीचे उपजिल्हाधिकारी शुभम नाईक, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते, पोलीस अधीक्षक तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष जागेवर जाऊन संपूर्ण मार्गाची चालत जाऊन पाहणी केली. प्राथमिक निरीक्षणानंतर आमदार शेट यांनी संबंधित ४२ शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आणि ‘ना हरकत दाखला’ देण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांचे सहकार्य मिळाल्यास जत्रेपूर्वीच हा पर्यायी रस्ता तयार करून भक्तांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गर्दी विभागण्यासाठी एकेरी वाहतूक मार्ग
मानसवाडा ते मुड्डेर या दरम्यान असलेल्या बांधाच्या कडेला एकूण ४२ शेतकऱ्यांची जमीन आहे. या शेतकऱ्यांनी जर ना हरकत दाखला दिला, तर सुमारे ४.२० मीटर रुंद असलेल्या या बांधावर डांबरीकरण करून एकेरी वाहतुकीसाठी रस्ता तयार करता येईल. हा रस्ता केवळ दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या येण्या-जाण्यासाठी वापरला जाईल. त्यामुळे होमकुंडाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पडणारा ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, असे आमदार शेट यांनी सांगितले.

हेही वाचा