भूखंड देण्याच्या बहाण्याने ९० लाखांची फसवणूक; एकाविरोधात गुन्हा दाखल

हरयाणातील मनजीत विरमाणीकडून तक्रार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
भूखंड देण्याच्या बहाण्याने ९० लाखांची फसवणूक; एकाविरोधात गुन्हा दाखल

पणजी : स्वतःला जमीनमालकांचा अधिकृत प्रतिनिधी असल्याचे सांगून आसगाव आणि हणजूण येथील भूखंड देण्याच्या बहाण्याने ९० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा शाखेने शिवोली येथील सतीश ताम्हणकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.

गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी हरयाणा येथील मनजीत विरमाणी हिने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, संशयित सतीश ताम्हणकर याने आसगाव आणि हणजूण येथील जमीन संदर्भात स्वतःला जमीनमालकांचा अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवले. त्यानुसार, संशयिताने हणजूण येथील सर्व्हे क्रमांक ५१२/४ मधील १३०० चौ. मी. आणि सर्व्हे क्रमांक ५१२/११ मधील ७५० चौ. मी. जमीन विक्री करण्याच्या आमिषाने या संदर्भात २४ एप्रिल २०२४ रोजी बनावट सामंजस्य करार केला. करारानंतर तक्रारदाराने संशयिताला २५ लाख रुपये चेकद्वारे तर ३० लाख रुपये रोख रक्कम दिले. यानंतर सतीश ताम्हणकर याने २९ जानेवारी २०२४ रोजी आसगाव येथील सर्व्हे क्रमांक ११८/१ मधील १३०० चौ. मी. जमिनीबाबत जीतेश कपूर याच्याकडे करार केला. त्यासाठी संशयिताने कपूर याच्याकडून ३० लाख रुपये बँक खात्यात जमा करून घेतले. दरम्यान, या संदर्भात तक्रारदारांनी मूळ जमीन मालकांशी संपर्क साधला असता संशयिताने तक्रारदाराची फसवणूक केल्याचे समोर आले. त्यात हणजूण येथील सर्व्हे क्रमांक ५१२/४ मधील १३०० चौ. मी. आणि सर्व्हे क्रमांक ५१२/११ मधील ७५० चौ. मी. जमीन सिद्धार्थ गोवेकर आणि कॅजीटन फालेरो यांची असल्याचे समोर आले. तर, आसगाव येथील ११८/१ मधील १३०० चौ. मी. जमीन मारिया फातिमा डिसोझा यांच्या मालकीची असून त्यांना या संदर्भात कोणतीच कल्पना देण्यात आली नव्हती. तसेच संशयिताने बनावट सामंजस्य करार केल्याचे समोर आले. या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा शाखेचे निरीक्षक विकास दयेकर यांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. 

हेही वाचा