आज ठोठावणार शिक्षा : वास्को येथे २०१९ साली घडला होता प्रकार

मडगाव : वास्को येथे २०१९ मध्ये कौशलेंद्र प्रताप सिंग (३३) या नौदल जवानाचा कौटुंबिक वादातून खून झाला होता. याप्रकरणी पत्नी संध्या चौहान हिला दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. शुक्रवारी आरोपीला शिक्षा सुनावली जाणार आहे.
लाकडी वस्तूने मारहाण करत पतीचा खून केल्याप्रकरणी पत्नी संध्या चौहान हिला वास्को पोलिसांनी अटक केली होती. घटनेच्या आधी दोन वर्षांपासून कौशलेंद्र व कुटुंबीय गोव्यात राहत होते. कौशलेंद्र हा पत्नी संध्या आणि सात वर्षाच्या मुलीसह वरुणापुरी येथील नौदल निवासी वसाहतीत राहत होता. ३ जून २०१९ रोजी पहाटे त्यांच्यात जोरदार भांडण झाले. यावेळी संध्या हिने रागाच्या भरात कौशलेंद्र याच्या डोक्यात लाकडी वस्तूने प्रहार केला, ज्यात त्याचा मृत्यू झाला. कौशलेंद्र हा दारूच्या नशेत वारंवार संध्या हिचा छळ करायचा आणि मारहाण करायचा. दि. २ जून रोजी रात्री उशिरा कौशलेंद्र हा घरी आला व त्याने घरातील वस्तूंची मोडतोड करण्यास सुरुवात केली. वादादरम्यान त्यांनी लहान मुलीलाही जमिनीवर ढकलले. त्यानंतर कौशलेंद्र याने संध्याला मारहाण करण्यास सुरुवात केली असता रागाच्या भरात संध्याने लाकडी वस्तूने त्याच्या डोक्यावर वार केला होता, असे पोलीस चौकशीत समोर आले होते.
या खूनप्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश राम प्रभु देसाई यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. गुरुवारी पतीच्या खूनप्रकरणी संध्या चौहान हिला न्यायालयाने दोषी ठरवले असून शुक्रवारी या प्रकरणी आरोपी संध्या हिला शिक्षा सुनावली जाणार आहे.
संतापाच्या भरात केला होता वार
दि. २ जून रोजी कौशलेंद्र याने घरातील वस्तूंची मोडतोड करण्यास सुरुवात केली. यावेळी पती- पत्नीमध्ये जोरात वाद झाला. वाद वाढल्याने कौशलेंद्रने लहान मुलीलाही ढकलून दिले होते. त्यानंतर संध्याला मारहाण करण्यास सुरुवात केली असता संतापाच्या भरात संध्या हिने लाकडी वस्तूने त्याच्या डोक्यावर वार केला होता. यातचा त्याचा मृत्यू झाला होता.