जात प्रमाणपत्र बोगस असल्याने नगरसेवक पूजा नाईक अपात्र

‘डीएमए’कडून नगरसेवक पद रद्द : फातोर्डा भाजप मंडळाकडून नाईक यांचा निषेध

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
जात प्रमाणपत्र बोगस असल्याने नगरसेवक पूजा नाईक अपात्र

मडगाव येथे पत्रकार परिषदेत निषेध करताना फातोर्डा भाजप मंडळाचे पदाधिकारी.

मडगाव : मडगावच्या गोवा फॉरवर्डच्या नगरसेवक पूजा नाईक यांनी पालिका निवडणुकांवेळी बोगस ओबीसी जात प्रमाणपत्र देत निवडणूक लढवली होती. हे सिद्ध झाल्यावर त्यांचे नगरसेवक पद नगरपालिका प्रशासन संचालनालयाकडून (डीएमए) रद्द करण्यात आले आहे. अशाप्रकारे बोगस प्रमाणपत्रावर आरक्षणाचा लाभ घेणे खर्‍या समाजबांधवांवर अन्याय आहे, अशा भावना फातोर्डा भाजप मंडळाने व्यक्त केल्या.
मडगाव पालिकेसमोर पत्रकार परिषद घेत फातोर्डा भाजप मंडळाकडून पूजा नाईक यांनी बोगस जात प्रमाणपत्र लावून निवडणूक लढवून नगरसेवकपद मिळवले याचा निषेध नोंदवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे व संविधानामुळे एससी, एसटी, ओबीसी यांना मिळालेले आरक्षण हे त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी आहे. काहीजण राजकारणातील बळ वापरून बनावट जात प्रमाणपत्राचा वापर करून आरक्षणाचा लाभ घेतल्यास हा अन्याय आहे, असे मत फातोर्डा भाजप पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले.
फातोर्डा मंडळ सरचिटणीस दिलीप नाईक यांनी सांगितले की, २०२१ मध्ये पालिका निवडणुकांवेळी भाजपकडून पुष्पा विर्डीकर यांनी प्रभाग चारमधून निवडणूक लढवली होती. हा प्रभाग ओबीसी महिलासाठी आरक्षित होता. याच प्रभागातून गोवा फॉरवर्डच्या उमेदवार पूजा नाईक या निवडणूक लढवत होत्या. पूजा नाईक यांच्याकडे असलेले ओबीसीचे जात प्रमाणपत्र हे बनावट होते. त्यानुसार विर्डीकर यांनी समाजकल्याण खात्याकडे बनावट जात प्रमाणपत्राबाबत तक्रार केली होती. साडेचार वर्षांनंतर आता पूजा नाईक यांचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. २६ फेब्रुवारी रोजी समाजकल्याण खात्याने सदर प्रमाणपत्र बनावट असल्याचे सांगितले. त्या आदेशाची प्रत निवडणूक आयोग व डीएमए कार्यालयातही देण्यात आले होते. त्यानुसार आता डीएमएने २ मार्च रोजी काढलेल्या आदेशानुसार पूजा नाईक यांना नगरसेवक पदावरून हटवण्यात आले आहे. अशाप्रकारे बनावट जात प्रमाणपत्राचा वापर हा खर्‍या समाजबांधवांवर अन्याय असल्याचे दिलीप नाईक म्हणाले.
फातोर्डा मंडळ अध्यक्ष श्वेता लोटलीकर यांनी सांगितले की, ओबीसी महिलांसाठी राखीव प्रभागातून बनावट ओबीसी प्रमाणपत्र घेत गोवा फॉरवर्डच्या पूजा नाईक यांनी निवडणूक लढली होती. हा समाजबांधवांवरील अन्याय असल्याने निषेध नोंदवतो, असेही सांगितले.
भंडारी समाजाचाही आक्षेप
मडगाव भंडारी समाजाचे अध्यक्ष दादी मयेकर यांनी सांगितले की, गुन्हे शाखेकडून चौकशीदरम्यान पूजा नाईक यांनी भंडारी समाजाचे घेतलेले प्रमाणपत्र हे २०१५ मधील कार्यकारिणी अस्तित्वात आल्यानंतर घेण्यात आल्याचे दिसून आले. पूजा नाईक हे भंडारी समाजातील नसल्याचे कागदपत्रांनुसार दिसून आले होते. त्यामुळे प्रमाणपत्र घेणार्‍यांसह ते देणार्‍यांवर चौकशीअंती कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

नगरसेवक पद रद्दबातल करण्याच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यावर ९ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आणखी काही माहिती देऊ शकत नाही. - पूजा नाईक                   

हेही वाचा