बनावट दागिने तारण ठेवून बँकेला २.६३ कोटींना गंडा; आरोपपत्र दाखल

मनी लाँड्रिंगचा संशय असल्याने ईडीकडून कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th March, 11:20 pm
बनावट दागिने तारण ठेवून बँकेला २.६३ कोटींना गंडा; आरोपपत्र दाखल

पणजी : बनावट दागिने तारण ठेवून युको बँकेची २.६३ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) संशयित हेमंत रायकर आणि गुंडू यल्लपा केलवेकर यांच्यासह इतरांविरोधात मेरशी येथील विशेष (पीएमएलए) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

या प्रकरणी युको बँकेचे तत्कालीन सरव्यवस्थापक ज्ञानंद शर्मा यांनी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाकडे (ईओसी) तक्रार दाखल केली होती. त्यात त्यांनी संशयित हेमंत रायकर हा बँकेतील दागिन्यांचे मूल्यांकन करणारा सोनार आहे. त्याने संशयित गुंडू यल्लपा केलवेकर याच्याशी संगनमत साधून युको बँकेच्या वेर्णा, फातोर्डा आणि मडगाव शाखेतून १२ जुलै २०१९ ते २० डिसेंबर २०२१ दरम्यान बनावट दागिने तारण ठेवून वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने २,६३,०७,२८० रुपये कर्ज घेतले. यासाठी हेमंत रायकर यांनी बनावट दागिने खरे असल्याचे प्रमाणपत्र दिल्याचे तक्रारीत म्हटले होते. तक्रारीची दखल घेऊन ईओसीने वरील संशयिताविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली होती.

या गुन्ह्याची दखल घेऊन सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) प्राथमिक चौकशी सुरू केली होती. त्यात मनी लाँड्रिंगचा संशय असल्याचे समोर आल्यानंतर ईडीने कारवाई सुरू केली. त्यानंतर ईडीने ५ सप्टेंबर २०२५ रोजी वरील संशयिताच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी ईडीने मोठ्या प्रमाणात दस्तावेज जप्त केले होते.

ईडीने १.१७ कोटी रुपये किमतीचे संशयितांचे मडगाव येथील एक दुकान, गुंडू केलवेकर याच्या पत्नीच्या बँक खात्यातील आणि एका सोनारकडे असलेले दागिने तात्पुरती जप्त केले आहेत. या प्रकरणात ईडीने यापूर्वी १.६० कोटी रुपयांची तात्पुरती मालमत्ता जप्त केली होती. दरम्यान या प्रकरणी ईडीने संशयित हेमंत रायकर आणि गुंडू यल्लपा केलवेकर याच्यासह इतरांविरोधात पीएमएलए अंतर्गत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. 

हेही वाचा