मुख्यमंत्री सावंत : मागील अर्थसंकल्पातील ९९.५३ टक्के आश्वासनांची पूर्तता

पणजी : शिरगावच्या लईराई जत्रेला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याचे आश्वासन आता बारगळले आहे. प्रशासकीय अडचणींमुळे गेल्या वर्षी दिलेले हे आश्वासन रद्द करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्प अंमलबजावणीच्या कृती अहवालात दिली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २०२६-२०२७ या वर्षाचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी गेल्या अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासनांच्या अंमलबजावणीचा कृती अहवाल सादर केला.
गेल्या अर्थसंकल्पात एकूण ६४३ आश्वासने देण्यात आली होती. त्यापैकी ६४० आश्वासनांची पूर्तता झाली आहे. काही आश्वासने पूर्ण झाली आहेत, तर काही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. हे प्रमाण ९९.५३ टक्के इतके आहे.
अर्थसंकल्पातील जी ३ आश्वासने रद्द करण्यात आली आहेत, त्यात शिरगाव लईराई जत्रेला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याच्या आश्वासनाचा समावेश आहे. याशिवाय, बोंडवेल तलावातून ३० एमएलडी पाणीपुरवठा करण्याचा प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. तसेच मद्यावर एकत्रित शुल्क आकारणी करण्याचे आश्वासनही रद्द झाले आहे.
वीज, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, कृषी या सर्व खात्यांतील आश्वासनांची पूर्तता सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.