मोरजी गावची देवी मोरजाई

मोरजाई, लईराई, केळबाई, महामाया, मिराबाई, अंजादीपा, शितलादेवी या घाटमाथ्यावरून आलेल्या सप्तभगिनी आपल्या इच्छेनुसार ठिकठिकाणी स्थायिक झाल्या. मोरजाई समुद्रातून जात असताना एका कोळ्याला सापडली. त्याने ती मूर्ती गावात आणून स्थापन केली व मंदिर उभारले.

Story: जत्रा |
06th March, 10:37 pm
मोरजी गावची  देवी मोरजाई

सर्वश्रेष्ठ संस्कृती म्हणून जगभरात भारतीय संस्कृतीला मानाचे स्थान आहे. लोकमानस सण-उत्सवाद्वारे संस्कृती वैभवसंपन्न करण्याचे महान कार्य करत असतानाच येथील धार्मिक स्थळे जगाच्या नकाशावर पर्यटन क्षेत्र म्हणून विराजमान झालेली दिसून येतात. येथील डोंगर-दऱ्या, निसर्गसौंदर्य, चर्च, मंदिरे, समुद्रकिनारे आकर्षित करतात. मिरामार, कळंगुट, कोलवा, वागातोर, बागा, हरमल, मोरजी या समुद्र किनाऱ्यांना तर एप्रिल-मे महिन्यात जत्रेचे स्वरूप येते. पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धीस आलेल्या मोरजी गावचे ग्रामदैवत श्री देवी मोरजाई एका कोळ्याला समुद्रात मिळाल्याचे सांगण्यात येते.

अथांग पसरलेला दर्यासागर, आकाशाला गवसणी घालणारे कल्पवृक्ष अशा सौंदर्य सृष्टीने नटलेल्या मोरजी गावच्या लोकांचा प्रमुख व्यवसाय भातशेती व बागायती. याबरोबरच मासेमारीचा व्यवसाय येथे मोठ्या प्रमाणात चालतो. शिवाय माडाच्या झाडाला पोषक वातावरण असल्याने नारळाची झाडेही येथे भरपूर प्रमाणात पाहावयास मिळतात. त्यामुळे माडापासून सूर काढणे, गूळ तयार करणे, वासे काढणे, निरनिराळ्या शोभेच्या वस्तू तयार करणे त्याचप्रमाणे माडाच्या मुळापासून शेंड्यापर्यंतच्या भागाचा उपयोग करून निरनिराळ्या वस्तू बनवणारे कलाकारही आपला व्यवसाय करतात. पण नारळाचे पीक भरपूर प्रमाणात येऊनही खोबऱ्यापासून तेल काढण्याचा घाणा मात्र इथे नाही. कारण आख्यायिकेनुसार मोरजी गावात तीनशे साठ इतकी देवचारांची संख्या होती. गावच्या अडल्यानडल्या लोकांना दृश्य व अदृश्यपणे मदत करण्याचे कार्य करत असताना गावाबाहेरील भूत-पिशाच्च गावच्या सीमेवर अडवून ठेवून गावच्या रक्षणाची जबाबदारी देवांनी देवचारावर सोपवलेली असते. पण मोरजी गावचे देवचारच निरनिराळ्या प्रकारे लोकांचा छळ करू लागले. त्यामुळे लोकमानसामध्ये या देवचारांविषयी भीती निर्माण झाली. तेव्हा या छळापासून वाचण्यासाठी त्यांनी देवाची प्रार्थना केली. श्रीदेव सत्पुरुषाच्या कृपाशीर्वादाने सदमशेटने या सतावणाऱ्या देवचारांना तेलाच्या घाण्याला जुंपले. त्याकाळी खोबऱ्यापासून तेल काढण्यासाठी घाण्याचा वापर करत. देवचारांना घाण्यास जुंपल्यामुळे गावात कोणीही तेलाचा घाणा सुरू करू नये अशी प्रथा आहे. यामुळे आजही मोरजी गावामध्ये या परंपरेचे पालन केले जाते. शिवाय कळसोत्सवाच्या दिवशी देवचारांना कोंबड्याचा बळी देण्याची प्रथा आहे. मोरजी गावात या दिवशी तीनशे साठ देवचारांना तीनशे साठ कोंबडे अर्पण करतात. 

मोरजाई, लईराई, केळबाई, महामाया, मिराबाई, अजादीपा, शितलादेवी या घाटमाथ्यावरून आलेल्या सप्तभगिनी आपल्या इच्छेनुसार ठिकाठिकाणी स्थायिक झाल्या. मोरजाई समुद्रातून जात असताना एका कोळ्याला सापडली. त्याने ती मूर्ती गावात आणून स्थापन केली व मंदिर उभारले. देवी मोरजाई महिषासुरमर्दिनी रूपात मोरजी गावात पहावयास मिळते. श्री महिषासूरमर्दिनी हे आदिमाया पार्वतीचेच रूप आहे. मूर्ती सापडली तो दिवस श्रावण कृष्ण त्रयोदशीचा होता. या दिवशी मोरजाईच्या मंदिरात जत्रा भरते. ग्रामपुरुषाच्या मंदिरात कलशाची पूजा केली जाते. मातीच्या कलशात पाणी भरून त्यात आंब्याची डहाळी ठेवतात. कलशातील पाण्याला शिवपार्वतीचा पुत्र कार्तिकेयाचे प्रतीक मानले जाते. कलश उत्सवाच्या दिवशी कार्तिकेय आपल्या मातेला भेटण्यासाठी मोरजाईच्या मंदिरात येतो व मातेच्या मांडीवर बसतो अशी श्रद्धा असल्याने उत्सवाच्या दिवशी पाण्याने भरलेला मातीचा कलश आणून देवी महिषासुरमर्दिनीच्या मांडीवर ठेवण्याची  प्रथा आहे. हा उत्सव दर वर्षी साजरा न करता तीन वर्षांनी साजरा केला जातो.

श्री सत्पुरुष, देवी भूमिका, कालभैरव, सटी, वीर, पीर, कळसालिंगा, द्वारपाल अशा देवदेवतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मंदिरातून वर्षभर अनेक उत्सव साजरे केले जातात.

मोरजाई शिमगोत्सवाची सुरुवात होळीच्या दिवसापासून होते. हरिजन वाड्यावर उत्सवाची सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रोळी, म्हारिंगण देवाची होळी घातली जाते. श्री मोरजाई देवीच्या मंदिरासमोर पारंपरिक जागेत होळी उभी करतात. विविध प्रकारची गाणी गाऊन "भली गे रोमटा " म्हणून रोमट काढतात. सामुदायिक गार्‍हाणे घालून रोमटाची सुरुवात होते. रोमट सात दिवस घरोघरी जाते. प्रत्येकाच्या घरी गणेशपूजन केले जाते. सातव्या दिवशी रोमटाचे सगळे मेळ मांडावर एकत्र येतात. तेथे नवस बोललेले लोक नवस फेडतात. आठव्या रात्री चोरीचे रोमट असते. हे रोमट खास पद्धतीने नाचवले जाते. या रोमटात लहान मुले सहभागी होतात. आंबे, फणस, काजू, केळीचे घड या वस्तू चोरून आणून मंदिरात ठेवतात व त्या वस्तू घेऊन रोमटाच्या तालावर नाचतात. श्री देव ब्राह्मण सत्पुरुष यांचा घोडा सजवून ठेवतात. ब्राह्मण देवाला गाऱ्हाणे घातल्यानंतर वाजत गाजत मोरजाईच्या मंदिरात जातात. तेथे घोडे नाचतात. शेवटी नवव्या दिवशी धुळवड साजरी केल्यानंतर हळदोणे घालून शिमगोत्सवाची सांगता होते.

हेही वाचा