नवसाला पावणारी देवी शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण

आज देवी "श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण " या नावाने प्रचलित आहे. भक्ताच्या हाकेला धावून जाणारी, नवसाला पावणारी देवी असा नावलौकिक आहे. कुंभारजुवे गावातील लोकांची ग्रामदेवी असल्यामुळे कोणतेही विधायक कार्य करायचे झाल्यास ग्रामस्थ प्रथम देवीचा कौल घेतात.

Story: जत्रा |
06th March, 10:40 pm
नवसाला पावणारी देवी  शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण

कदंब, आदिलशहा, यादव, मराठे यासारखे गोव्यावर राज्य करणारे राज्यकर्ते बदलत गेले. आणि मुख्यत्वे व्यापार व शक्य तितका धर्मप्रचार हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून हजारो मैलांचा सागरी प्रवास करून आलेल्या पोर्तुगीजांनी स्थानिक सत्ताधीशांना हाताशी धरून राज्यसत्ता बळकावली. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी येथील शेकडो मंदिरे उद्ध्वस्त करून, गाभाऱ्यातील मूर्ती तोडून फोडून नदीत फेकून दिल्या. प्रतिकार करणाऱ्यांच्या अख्ख्या कुटुंबाची कत्तल होऊ लागली. त्यामुळे हिंदू बांधवांना कुणीच वाली राहिला नाही. मूर्तीची होत असलेली विटंबना, छिन्नविच्छिन्नता, बाटवा-बाटवी, धार्मिक अत्याचार याला कंटाळून धर्म संकटात सापडलेल्या लोकांनी सोळाव्या शतकात पोर्तुगीज राजवटीखाली असलेल्या तिसवाडी, बार्देश, सासष्टी यासारख्या भागातून स्वतःच्या देव-देवतांना घेऊन सुरक्षित ठिकाणी पलायन करण्यास सुरुवात केली. 

फोंडा महालावर यावेळी सौंदेकर राजे राज्य करीत होते. त्यामुळे हा भाग देवदेवतांना सुरक्षित होता. यास्तव सासष्टी, बार्देश, तिसवाडी या भागातील मंदिरांचे मडकई, म्हार्दोळ, माशेल या भागात स्थलांतर झाले. वरगाव गावातील माशेल वाड्यावर बांधण्यात आलेले श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण हे त्यापैकी एक स्थलांतरित झालेले मंदिर आहे. माशेल वाड्यावर देवकी-कृष्ण, रवळनाथ, चिमुलकरीण, लक्ष्मीनारायण, गजांतलक्ष्मी अशी कितीतरी मंदिरे पहावयास मिळतात. यामुळे या भागाला ‘देऊळवाडा’ असेही म्हटले जाते.

खोर्ली, धुळापेर, कुमार-साय या गावातील देवीला एका व्यापाऱ्याने आपल्या होडीत बसवून कुंभारजुवे गावात आणले, पण कुंभारजुवे हा भाग तिसवाडी तालुक्यात येत असल्याने व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य नसल्याने काही दिवसांनी देवीची माशेल येथील देऊळवाड्यावर स्थापना करण्यात आली. आज देवी "श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण " या नावाने प्रचलित आहे. भक्ताच्या हाकेला धावून जाणारी, नवसाला पावणारी देवी असा नावलौकिक आहे. कुंभारजुवे गावातील लोकांची ग्रामदेवी असल्यामुळे कोणतेही विधायक कार्य करायचे झाल्यास ग्रामस्थ प्रथम देवीचा कौल घेतात. त्यामुळे कौल घेण्यासाठी येणाऱ्या लोकांची येथे सतत गर्दी असते. समस्त कुंभारजुवे ग्रामस्थ या देवस्थानचे महाजन आहेत. श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण मंदिराच्या गाभाऱ्यात कलशरूपात पाहावयास मिळते. पंचधातूपासून बनवलेला कलश पाण्याने भरून कलशाला देवीचा मुखवटा घालतात व दररोज पूजाअर्चा करतात. उत्सव काळात मात्र या मंगल कलशाला वस्त्र नेसवून, सुवर्ण अलंकार घालून सजवले जाते. गुढीपाडव्याला आठ ते दहा दिवस असताना देवी कुंभारजुवे गावात जाते. ‘सारंगी आंख’ या स्थानावर गुढी पाडव्यापर्यंत देवीचे वास्तव्य असते. गुढीपाडव्यापासून आपल्या भक्तजनांची दुःख, दारिद्र्य, संकटे दूर करून त्याला आशीर्वाद देण्यासाठी देवी गावातील घरांना भेट देते, प्रत्येक घरात पूजाअर्चा करून देवीला सन्मानित करतात, सुवासिनी महिला देवीची ओटी भरतात. जवळजवळ एक महिना देवी कुंभारजुवे गावात असते. सर्व घरांना भेट देऊन झाल्यानंतर पालखी मंदिरात येते. यावेळी नारळ ओवाळून देवीला मंदिरात आणले जाते. 

श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण मंदिरात साजरा होणारा पारंपरिक उत्सव म्हणजे सांगोडोत्सव. या सांगोड उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे. कुंभारजुवे येथील ग्रामस्थ प्रसिद्ध वाडिये कुटुंबीयांनी आपल्या घरातील गणेश मूर्ती माशेल येथे श्री देवी कुंभारजुवेकरीणीच्या मंदिरात आणून ठेवली. वाडिये कुटुंबाच्या घरात आजदेखील गणेश मूर्ती पुजली जात नाही. मात्र त्या वेळेपासून ती मूर्ती दरवर्षी कुंभारजुवेकरीण मंदिरात पुजली जाते व सातव्या दिवशी थाटामाटात मोठ्या उत्साहाने या मूर्तीचे अनुपम सांगोडोत्सवाने विसर्जन केले जाते. सनई चौघड्यांच्या वादनाने श्रींची मूर्ती माशेल तारीवाड्यावर पोहोचल्यानंतर पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या सांगोडात ठेवली जाते. आणि मग शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण सांगोडोत्सवाला ‘देवते  पाव गे’, ‘शांतादुर्गा माता की जय’ अशा जयघोषाने सुरुवात होते. यावेळी सांगोडावर रिद्धी-सिद्धी, शंकासूर, वेताळ अशी सोंगे केलेले ग्रामस्थ शिवाय इतरही लोक उभे असतात. या सांगोडासमवेत इतरही चित्ररथाचे सांगोड श्रींच्या मिरवणुकीत सहभागी होतात. इतर सात दिवसांच्या गणेश मूर्तीही विसर्जनासाठी नेतात. श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण मंदिराच्या श्रींच्या विसर्जनाप्रित्यर्थ सांगोडोत्सवानिमित्त पारंपरिक चित्ररथ स्पर्धा आयोजित केल्या जातात. हे चित्ररथ देखील गावातील तरुण मंडळी करत असल्याने त्यांच्या कलेला वाव मिळतो. आपला चित्ररथ आकर्षक कसा होईल याकडे प्रत्येकाचा कल असतो. या उत्सवामुळे नवकलाकार निर्मितीस हातभार लागतो. श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण पारंपरिक सांगोडोत्सव सर्व गोमंतकामध्ये प्रसिद्ध असल्याने भक्तजनांची, कलाकारांची तसेच बघ्यांचीही अलोट गर्दी असते.

या देवीचा आणखी एक साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे मालिनी पौर्णिमा. पौष शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जाणारा हा उत्सव गोमंतकातही प्रसिद्ध आहे. या दिवशी सकाळपासून मंदिरांमध्ये धार्मिक विधी, अभिषेक, पूजाअर्चा चालूच असते. दिवसभर देवदर्शनासाठी आलेल्या भक्तजनांची ये-जा असते. सुवर्णालंकारांनी देवीची मूर्ती सजवली जाते. फुलांनी सजवलेल्या पालखीत बसवून सुवारी वादन व पारंपरिक वाद्य संगीतासह देवीच्या मंदिराच्या परिसरात मिरवणूक काढली जाते. यावेळी दारूकामाची आतषबाजी होते. सारा परिसर विद्युत रोषणाईने तेजोमय होऊन जातो. देऊळवाड्यावर मेवा-मिठाई, भांडी-कुंडी, कपडे-लत्ते, खेळण्यांची दुकाने थाटलेली असतात. मातीची भांडी, मिरची, कांदा, वांग्याची रोपे, बांबूपासून बनवलेल्या टोपल्या अशा किती तरी प्रकारे सहजासहजी उपलब्ध न होणारे साहित्य हमखास मिळणारी जत्रा म्हणजे मालिनी पौर्णिमा. हे साहित्य खरेदी करण्यासाठी म्हणून गोमंतकातील कानाकोपऱ्यातील लोक इथे येतात. पौर्णिमेच्या संध्याकाळपासूनच येथे गर्दी असते. माशेलातील सगळे रस्ते माणसांनी भरून जातात. रात्री अकरा बाराच्या दरम्यात गर्दी वाढत जाते. प्रत्येकाच्या घरी पाहुणे, मित्रमंडळी, सगेसोयरे यांची वर्दळ चालू असते. घराघरातून सुग्रास भोजनाचा वास दरवळत असतो. या दिवशी माशेलवासीयांकडे शिरवळ्यो हा तांदळापासून केलेला गोड पदार्थ बनवला जातो. ही जत्रा सतत पाच दिवस चालते. जत्रेच्या निमित्ताने नाटके, पावणी तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले असते. त्यानंतर येथील इतर मंदिरातूनही उत्सव असल्यामुळे मालिनी पौर्णिमेच्या निमित्ताने भरलेली फेरी जवळजवळ महिनाभर असते. मालिनी पौर्णिमेच्या दिवशी येऊ न शकलेले देवीचे भक्तगण इतर दिवशी मंदिरात येऊन देवीचा आशीर्वाद घेतात.

हेही वाचा