
पणजी : धारगळ येथील रेडकर हॉस्पिटलजवळ एका संशयित बेकायदा बांधकामाचा सरकारी पंचनामा सुरू असताना, तक्रारदाराचे वकील ॲड. सदानंद वायंगणकर यांच्यावर जमावाने भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार स्थानिक सरपंच, गट विकास अधिकारी आणि पोलीस पथकाच्या उपस्थितीत घडल्याने परिसरात खळबळ माजली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निलेश पाटेकर यांनी धारगळ येथील एका बांधकामाबाबत ते बेकायदेशीर असल्याचा दावा करत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी आणि पंचनामा करण्यासाठी गेले होते. तक्रारदाराची बाजू मांडण्यासाठी ॲड. सदानंद वायंगणकर तिथे उपस्थित होते. अधिकारी आपले काम करत असतानाच, अचानक जमलेल्या संतप्त जमावाने वायंगणकर यांना लक्ष्य केले आणि त्यांच्यावर हल्ला चढवला.
सरकारी यंत्रणा आणि पोलीस समोर उभे असतानाही जमावाने वकिलाला मारहाण केल्याने प्रशासनाचा वचक संपला आहे का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या वायंगणकर यांना तातडीने उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एखाद्या कायदेशीर प्रक्रियेत वकिलाला अशा प्रकारे लक्ष्य केले जाणे हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे मत कायदेतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणाला ताब्यात घेतले आहे का, याची माहिती प्रतीक्षेत असून, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.