दिवस पहिला : नगरनियोजन कायद्यातील वादग्रस्त 'कलम ३९ अ' रद्द करणे आणि जमीन विक्रीवर निर्बंध आणणे यांसारख्या गंभीर विषयांवरून सभागृहात खडाजंगी होण्याची चिन्हे.

पणजी: गोवा विधानसभेचे बहुचर्चित अर्थसंकल्पीय अधिवेशन आज शुक्रवार, ६ मार्चपासून सुरू होत असून राज्याच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहिला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार असून, मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा सलग सातवा अर्थसंकल्प असेल. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी या अर्थसंकल्पात कोणतीही मोठी करवाढ नसेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे. २७ मार्चपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात राज्याच्या शाश्वत विकासावर प्रामुख्याने भर दिला जाण्याची चिन्हे आहेत.

दुसरीकडे, हे अधिवेशन वादळी ठरण्याचे संकेत मिळत आहेत. नगरनियोजन कायद्यातील वादग्रस्त 'कलम ३९ अ' रद्द करण्याच्या मागणीसाठी विरोधी आमदारांनी तब्बल १५ खासगी विधेयके सादर केली असून, जमीन विक्रीवरील निर्बंधांच्या मुद्द्यावरूनही सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. एकूण २३९५ तारांकित व अतारांकित प्रश्नांच्या माध्यमातून विरोधक विविध लोकहितार्थ प्रश्नांवर सरकारला जाब विचारतील. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्षामुळे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन अत्यंत गाजण्याची दाट शक्यता आहे.
पहा व्हिडिओ :
LIVE UPDATES :
सकाळी ११.४० : मिराबाग येथील प्रस्तावित बंधाऱ्याला विरोध करणाऱ्या आंदोलकांनी विधानसभेच्या गॅलरीतून फलक दाखवून निषेध केला. सभागृहात गदारोळ. मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना अटक करण्याची केली मागणी. विधानसभेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह.
सकाळी ११.१० : एकवेळ लोकप्रतिनिधी, विरोधक सरकारच्या धोरणांचा विरोध करतात ही बाब समजू शकतो, पण सत्ताधारी आमदार आणि मंत्री देखील जेव्हा रस्त्यावर उतरून एखाद्या गोष्टीला विरोध दर्शवतात तेव्हा सरकारची धोरणे चुकली हे म्हणण्यास वाव आहे : विजय सरदेसाई, फातोर्डाचे आमदार.
सकाळी १०.४५ : कधी काय बोलावे आणि बोलू नये याचे भान असणे गरजेचे : दामू नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष.
युरी म्हणाले- सरकार म्हणते सरकार तुमच्या दारी, सरकारने लोकांना केले भिकारी.
सकाळी १०.३५ : सभागृहाच्या पटलावर दिलेली आश्वासने पाळणे गरजेचे : वीरेश बोरकर, सांत आंद्रेचे आमदार.
सकाळी ११.२५ : टीसीपीच्या कलम ३९ ए ला माझा सुरुवातीपासूनच विरोध : जीत आरोलकर, मांद्रेचे आमदार.
सकाळी १०.१८ : मंत्रिपद नसले तरी जनतेचे प्रेम कायम : गोविंद गावडे, आमदार प्रियोळ.
सकाळी १०.१० : अर्थसंकल्पीय अधिवेशनात धोरणात्मक मुद्यांवर चर्चा होईल : रमेश तवडकर, क्रीडामंत्री.