पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील (West Asia) युद्धामुळे (War) जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम होत असताना अमेरिकेने (USA) भारताला (India) रशियाकडून (Russia) तेल खरेदीसाठी ३० दिवसांची तात्पुरती सवलत (waiver) दिली आहे. या निर्णयामुळे जागतिक बाजारात तेलाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होईल, असे अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट यांनी स्पष्ट केले.
स्कॉट बेसेन्ट यांनी शुक्रवारी (६ मार्च २०२६) ‘ट्वीटर’वरील निवेदनात सांगितले की, अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाकडून भारतीय रिफायनरींना रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी ३० दिवसांची तात्पुरती परवानगी देण्यात येत आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे तेलपुरवठा विस्कळीत झाला असून; जागतिक बाजारातील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यांच्या मते, ही सवलत अत्यंत अल्पकालीन असल्याने रशियाच्या सरकारला मोठा आर्थिक फायदा होणार नाही. ही परवानगी केवळ समुद्रात अडकलेल्या (stranded) तेलाच्या व्यवहारांपुरती मर्यादित असेल. त्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारावर निर्माण झालेला ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.
बेसेन्ट यांनी पुढे सांगितले की, भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार असून; भारताने अमेरिकेकडून तेल खरेदी वाढवावी, अशी अमेरिकेची अपेक्षा आहे.
दरम्यान, अधिकृत आकडेवारीनुसार २०२६च्या जानेवारीपासून भारताने रशियाकडून तेल आयात कमी करण्यास सुरूवात केली आहे. त्याऐवजी भारताने आखाती देशांमधून तसेच अमेरिकेकडून अधिक प्रमाणात तेल खरेदी केली आहे. परिणामी भारताच्या एकूण तेल आयातीत रशियाचा वाटा मे २०२२ नंतर प्रथमच २० टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे.
भारत आणि अमेरिकेदरम्यान संभाव्य व्यापार करारावरही चर्चा सुरू होती. मात्र; अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने २० फेब्रुवारी रोजी परस्पर शुल्क (reciprocal tariffs) रद्द केल्यानंतर या कराराबाबतची प्रक्रिया सध्या अनिश्चिततेत असल्याचे संकेत मिळत आहेत.