मिराबाग येथील प्रस्तावित बंधाऱ्याविरोधात लोहिया मैदानावर निदर्शने

आंदोलनाची अधिकृत परवानगी नसल्याने आंदोलकांना पोलिसांनी हटवले

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
मिराबाग येथील प्रस्तावित बंधाऱ्याविरोधात लोहिया मैदानावर निदर्शने

मडगाव: मिराबाग बंधाऱ्याविरोधात मडगावातील लोहिया मैदानावर नागरिकांनी निदर्शने सुरू केली होती. मात्र, मडगाव पालिकेकडून कोणतीही परवानगी घेतलेली नसल्याने, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मडगाव पोलिसांनी निदर्शकांना घटनास्थळावरून हटवून ताब्यात घेतले.

मिराबाग बंधाऱ्याला होणारा विरोध आता आणखी तीव्र होत आहे. राज्य सरकारकडून या प्रश्नाकडे लक्ष दिले जात नसल्याने स्थानिक नागरिकांनी बंधाऱ्याच्या ठिकाणचे आंदोलन आता मडगावातील लोहिया मैदानावर सुरू केले होते. या ठिकाणी सासष्टीतील सामाजिक कार्यकर्त्यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी गर्दी केली होती. सकाळपासून नागरिकांनी लोहिया मैदानावर ठाण मांडत सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली होती. मीराबाग बंधाऱ्याच्या विरोधात यापूर्वी विधानसभेतही घोषणाबाजी करण्यात आली होती.

यानंतर मडगाव पोलिसांनी लोहिया मैदानावर आंदोलन करण्यासाठी परवानगीचे पुरावे मागितले. मात्र, मडगाव पालिकेकडे अर्ज केलेला असून त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नसल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले. यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या दक्षिण गोवा खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनीही पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लोहिया मैदानावरील आंदोलनाची सर्व जबाबदारी स्वीकारत, दुसऱ्या कोणत्याही कार्यक्रमासाठी अर्ज आलेला नसल्यास परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली.

यानंतरही प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली नाही. अखेर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी निदर्शकांना लोहिया मैदानावरून निघून जाण्यास सांगितले. मात्र, निदर्शकांनी तेथून हलण्यास नकार दिल्याने प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून पोलिसांनी निदर्शकांना ताब्यात घेऊन मडगाव पोलीस स्थानकात नेले.

हेही वाचा