पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुशावती जिल्ह्यात निर्बंध; जमावबंधी लागू व मद्यविक्री बंद!

संबंधित पंचायत क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांसाठी भरपगारी सुट्टी जाहीर!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
7 hours ago
पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुशावती जिल्ह्यात निर्बंध; जमावबंधी लागू व मद्यविक्री बंद!

मडगाव: कुशावती जिल्ह्यातील बाळ्ळी-अडणे पंचायत आणि लोलये-पोळये पंचायतीमधील प्रभाग क्रमांक आठमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर, कुशावतीचे जिल्हाधिकारी एग्ना क्लिंटस यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. मतदानाच्या ४८ तास आधी प्रचारासह ध्वनिक्षेपक वापरावर बंदी घालण्यात आली असून, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.

कुशावती जिल्ह्यातील बाळ्ळी-अडणे व लोलये-पोळये पंचायतींच्या प्रभागांत होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी ६ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून ८ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत जमावबंदी लागू असेल. या काळात बेकायदेशीर जमाव जमवणे, मिरवणुका, रॅली काढणे किंवा जाहीर सभांवर पूर्णपणे बंदी आहे. याशिवाय, मतदानाच्या ४८ तास आधीपासून प्रचारासाठी लाऊडस्पीकर वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

मतदान शांततेत पार पडण्यासाठी ७ ते ९ मार्च २०२६ या काळात संबंधित प्रभागांमध्ये मद्यविक्रीवर बंदी असेल. निवडणूक क्षेत्रातील सर्व दारूची दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि क्लबमध्ये मद्यविक्री किंवा मद्य बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच, मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी ८ मार्च रोजी संबंधित क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांसाठी 'पेड हॉलिडे' (भरपगारी सुट्टी) जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हे आदेश लागू करण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता' अंतर्गत कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी एग्ना क्लिंटस यांनी दिला आहे.

 


हेही वाचा