रॅली काढून नोंदवला निषेध

सांगे : मिराबाग, सावर्डे (Sanvordem) येथे प्रस्तावित बंधाऱ्याविरोधात कुडचडे (Curchorem) बाजारात १ तास दुकाने बंद ठेवून दुकानदारांनी निषेध नोंदवला. जागृती फेरीही काढण्यात आली.
गेले २५ दिवस मिराबाग येथे बंधाऱ्या विरोधात धरणे आंदोलन चालू आहे. लोहिया मैदानावरही आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. तरीही सरकार दाद देत नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. घरे, गाव, निसर्ग, नदी राखण्यासाठी काहीही करायला तयार आहोत. बंधारा प्रकल्प रद्द होईपर्यंत आंदोलन चालू ठेवण्यात येणार असल्याचा इशारा आंदोलकांतर्फे देण्यात आला.
यावेळी जयकुमार खांडेकर यांनी सांगितले की, लोकांना विश्वासात न घेता हा लोकहित विरोधी बंधारा प्रकल्प उभारण्याचा घाट घातला आहे. गाव, मंदिरे बुडवणारा बंधारा प्रकल्प मिराबागात नकोच. त्यासाठी निषेध म्हणून आम्ही एक तास दुकाने बंद ठेवली आहेत. कुडचडेच्या लोकांचा बंधाऱ्या विरोधातील आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे. यापुढेही बाजार बंद करून त्यांच्याबरोबर राहणार असल्याचे खांडेकर यांनी सांगितले.
मनोहर नाईक म्हणाले की, गेले २५ दिवस बंधाऱ्याविरोधात लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. लोक न्याय मागत आहेत. गाव वाचविण्या करता भीक मागत आहेत. तरीही सरकारी यंत्रणेला दयामाया नाही. हा विषय मिराबाग पुरता नसून, सावर्डे, कुडचडे, सांगे (Sanguem) येथील सर्वांचा आहे. लोकांना नको असल्यास बंधारा प्रकल्प रद्द करा. यापुढे बंधाऱ्याविरोधात गोवा पेटणार असल्याचा इशारा मनोहर नाईक यांनी दिला.