विरोधी आमदारांची मागणी : मदत देण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करावेत

पणजी : सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या स्थितीवर विधानसभेत चर्चा झाली. युद्धजन्य परिस्थितीत अडकून पडलेल्या गोवेकरांना सुरक्षितपणे घरी परत आणण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात, तसेच या कठीण काळात त्यांना आवश्यक ती मदत देण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणी विरोधी आमदारांनी केली.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस आणि केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी विधानसभेत शून्य प्रहराच्या वेळी आखाती देशांत अडकलेल्या गोवेकरांचा विषय मांडला.
यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले की, आखाती देशांत काम करणारे गोवेकर आपली वैयक्तिक सुरक्षा आणि नोकरीबाबत चिंतेत असून सध्या ते भीतीखाली आहेत. त्यामुळे जर परिस्थिती हाताबाहेर गेली, तर त्यांना मायदेशी परत आणण्यासाठीच्या योजना आधीच तयार असायला हव्यात.
‘हेल्प डेस्क’ स्थापन करा : आलेमाव
सध्या युद्धात सापडलेल्या देशांत काम करणाऱ्या कुटुंबियांच्या पैशांवर गोव्यातील अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. त्यांची नोकरी टिकेल का आणि ते सुरक्षित आहेत का, या प्रश्नांमुळे भीतीचे वातावरण आहे. सरकारने एक समर्पित ‘हेल्प डेस्क’ स्थापन करावा आणि परिस्थिती बिघडल्यास त्यांना गोव्यात परत आणण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली.
‘गल्फ अपडेट ब्रॉडकास्ट’ सुरू करा : वेन्झी
बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस यांनी मागणी केली की, जे गोवेकर परत येऊ इच्छितात त्यांच्यासाठी विमानांची सोय करावी, व्हिसा आणि ओसीआय संबंधित विषय मार्गी लावावेत, तसेच मानसिक तणावाखाली असलेल्या लोकांसाठी समुपदेशनाची सोय करावी. त्याशिवाय ओमान, दुबई, सौदी, कुवेत, दोहा, अबू धाबी, बहरीन आणि इतर आखाती देशांत राहणाऱ्या लोकांसाठी गोवा सरकारने दररोज ‘गल्फ अपडेट ब्रॉडकास्ट’ सुरू करावे.
चार्टर्ड विमानांची सोय करा : एल्टन
केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी सल्ला दिला की, आखाती देशांत अडकलेले अनेक जण गोव्यात परत येऊ इच्छितात. काहींच्या कुटुंबातील सदस्य, जसे की आई-वडील गोव्यात वारले आहेत, पण त्यांना परत येण्यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे सरकारने विशेष विमानांचा बंदोबस्त करावा. शक्य असल्यास त्यांना चार्टर्ड विमानांनी गोव्यात परत आणावे.