३० लाखांचे दागिने कस्टमने जप्त केल्याचा रचला बनाव

पणजी : तिसवाडी तालुक्यातील एका ३७ वर्षीय महिलेशी संशयिताने स्वीडिश नागरिक असल्याचा बनाव करून ‘निकाह फॉरेव्हर’ या मुस्लीम वधू-वर मोबाईल अॅपच्या माध्यमातून मैत्री केली. त्यानंतर महिलेला खोटे फ्लाईट बुकिंग तपशील पाठवून तिच्यासाठी आणलेले ३० लाख रुपयांचे दागिने कस्टमने जप्त केल्याचा दावा करून तिला ६.८८ लाखांचा गंडा घातला.
गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पणजी परिसरात राहत असलेल्या एका ३७ वर्षीय महिलेने ‘निकाह फॉरेव्हर’ या मुस्लीम वधूवर सूचक मोबाईल अॅपमध्ये नोंदणी केली होती. त्यात तिची ओळख एका व्यक्तीशी झाली. संशयिताने स्वीडिश नागरिक असल्याचा बनाव करून त्या अॅपवर नोंदणी केली होती. संशयिताने तक्रारदार महिलेशी मैत्री केली. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिला भेटण्यासाठी गोव्यात येत असल्याचा बनाव केला. त्यासाठी संशयिताने तक्रारदार महिलेशी अॅपद्वारे संपर्क साधल्यानंतर व्हॉट्सअॅपवरून संवाद चालू ठेवला. त्याने १४ फेब्रुवारी २०२६ रोजी गोव्यात येणार असल्याचे सांगितले आणि खोटे फ्लाईट बुकिंग तपशील पाठवले. नंतर हॉटेल बुकिंग शुल्क, फ्लाईट तिकीट खर्च, ३० लाख रुपयांचे आणलेले दागिने कस्टमने जप्त केल्याचे सांगितले. तसेच त्याला कस्टमने अटक केल्याची माहिती देत कोठडीतून सुटका करून घेण्यासाठी वकील शुल्क, कस्टम्स ड्युटी व इतर शुल्क अशा विविध खोट्या बहाण्यांवरून महिलेला ६.८८ लाख रुपये घेऊन गंडा घालण्यात आला. तक्रारदार महिलेने संशयिताला १० ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत डिजिटल पेमेंटद्वारे एकूण ६ लाख ८८ हजार रुपये विविध खात्यांवर जमा केले. याच दरम्यान तिची फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने सायबर विभागात तक्रार दाखल केली. याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी अज्ञात व्हॉट्सअॅप मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.