
मडगाव : घरगुती व व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) किमतीत वाढ झालेली आहे. ग्राहकांनी जरी ७ मार्च पूर्वी सिलिंडरचे बुकिंग केले असेल, तरीही आजपासून किंवा त्यानंतर मिळणार्या बिलावर गोव्यासाठी (Goa) नवीन दर हा ९२७ रुपयेच आकारला जाईल, असे सांगत सिलिंडर घेताना वितरकाकडे नेहमी बिलाची मागणी करा, असे आवाहन गोवा कॅनकडून (GOACAN) करण्यात आलेले आहे.
राज्यासह देशातील घरगुती एलपीजी ग्राहकांना वाढलेल्या दरामुळे आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे. ७ मार्चपासून घरगुती (Domestic) एलपीजी (LPG) सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. आता १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरसाठी ग्राहकांना ९२७ रुपये मोजावे लागणार आहेत.
याआधी राज्यातील घरगुती एलपीजी किंमत ८६७ रुपये होती. त्यामुळे आता एका सिलिंडरमागे ग्राहकांना ६० रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर गोवा कॅनने सतर्कता बाळगण्यासाठी पत्रक जारी केलेले आहे. त्यानुसार ७ मार्चपासून सिलिंडरचे दर वाढलेले असून ७ मार्च पूर्वी जरी ग्राहकांनी बुकींग केलेले असले तरीही आताच्या नव्या दरानुसार बिलिंग केले जाणार आहे.
सिलिंडरची डिलिव्हरी त्याचे वजन काट्यावर तपासून घ्या आणि सील योग्यरित्या बंद असल्याची खात्री करुन घ्यावी. गॅस एजन्सीने होम डिलिव्हरी नाकारली किंवा जास्तीचे पैसे आकारले, तर ग्राहक [email protected] या ईमेलवर तक्रार नोंदवू शकतात. गॅस कंपनी आणि वितरक यांची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी pmuy.gov.in/mylpg.html या संकेतस्थळाला भेट द्यावी. महागाईच्या या काळात ग्राहकांनी सतर्क राहण्याचे आवाहन गोवा कॅनतर्फे करण्यात आले आहे.