राज्यातील ४० वर्षांवरील महिलांसाठी ‘चेक्ड बाय दोतोर’ मोहीम

जागतिक महिला दिनी मुख्यमंत्र्यांची घोषणा; सर्व चाचण्या मोफत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11 hours ago
राज्यातील ४० वर्षांवरील महिलांसाठी ‘चेक्ड बाय दोतोर’ मोहीम

पणजी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील महिलांच्या आरोग्यासाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक योजना जाहीर केली आहे. गोव्यातील ४० वर्षांवरील सर्व महिलांसाठी ‘चेक्ड बाय दोतोर’ ही विशेष आरोग्य मोहीम राबवण्यात येणार असून, याअंतर्गत सरकारी रुग्णालयांमध्ये महिलांची संपूर्ण शरीर तपासणी मोफत केली जाणार आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शुभेच्छा देताना मुख्यमंत्री म्हणाले की, महिला कुटुंबातील प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेतात, मात्र स्वतःच्या प्रकृतीकडे त्यांचे वारंवार दुर्लक्ष होते. हीच बाब लक्षात घेऊन सरकारने राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे (पीएचसी), सामुदायिक आरोग्य केंद्रे (सीएचसी), जिल्हा रुग्णालये आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) येथे ४० वर्षांवरील महिलांसाठी सर्व प्रकारच्या आरोग्य चाचण्या मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत.

राज्यात रविवारी महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने पणजीसह विविध भागांत महिलांच्या सन्मानार्थ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'चेक्ड बाय दोतोर' या मोहिमेचा राज्यातील जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा आणि आपल्या आरोग्याप्रती जागरूक राहावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. या उपक्रमामुळे राज्यातील महिलांच्या आरोग्य सुविधेत मोठी सुधारणा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

खासगी रुग्णालयांतही सवलतीच्या दरात सुविधा
या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ सरकारी रुग्णालयेच नव्हे, तर खासगी रुग्णालयांमध्येही सवलतीच्या दरात तपासणीची सोय करण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यात किमान एका खासगी रुग्णालयाची निवड करण्यात आली असून, तिथे महिलांना अल्प दरात या चाचण्या करून घेता येतील. साधारणपणे या चाचण्यांसाठी खासगी ठिकाणी ८ ते १० हजार रुपये खर्च येतो, परंतु या मोहिमेअंतर्गत महिलांना अत्यंत कमी शुल्कात ही सुविधा मिळणार आहे. मणिपालसारख्या नामांकित रुग्णालयांचाही या मोहिमेत सहभाग आहे.

हेही वाचा